गोव्यात सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 12:48 AM2018-08-02T00:48:42+5:302018-08-02T00:48:55+5:30
गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो यांच्या जीवितास सनातनी प्रवृत्तीच्या लोकांकडून धोका असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. लोकशाही विचारांवरील हल्ल्याचा धर्मनिरपेक्ष विचारांच्या समुदायाने बुधवारी सभा घेऊन निषेध केला.
पणजी : गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो यांच्या जीवितास सनातनी प्रवृत्तीच्या लोकांकडून धोका असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. लोकशाही विचारांवरील हल्ल्याचा धर्मनिरपेक्ष विचारांच्या समुदायाने बुधवारी सभा घेऊन निषेध केला. राज्यातील सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी ठरावाद्वारे राज्य सरकारला केली.
दक्षिणायन अभियानने आयोजित केलेल्या निषेध सभेस साहित्यिक, विविध वृत्तपत्रांचे संपादक, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. सामाजिक विषयांचे अभ्यासक मोहनदास लोलयेकर म्हणाले, २००९ च्या मडगाव बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर तपास यंत्रणांनी त्याची पाळेमुळे खणून काढली असती, तर आजची सभा घेण्याची वेळच आली नसती. देशात आणि गोव्यात जातीयवादी घटना घडल्याच नसत्या. अशा घटनांना खतपाणी घालणाऱ्या जातीयवादी संस्थांचा सरकारने तपास करावा.
साहित्यिक एन. शिवदास म्हणाले की, लेखक हा कधी जात, पात, धर्म पाहून लेखन करीत नाही, तर ते त्याच्या पलीकडे जाऊन लिहितात. जीवे मारण्याची धमकी केवळ मावजो यांना दिली नसून, ती राज्यातील सर्व लेखकांना आहे, हे समजून घेतले पाहिजे.
धमकीला भीक घालत नाही- मावजो
येथे आपण एक लेखक म्हणून आलो नाही, तर गोंयकार म्हणून आलो आहे. आपण धमकीला भीक घालत नाही. गोंयचे गोंयकारपण सांभाळायचे काम आपण लेखणीतून केले आहे. ही धमकी मला दिली नसून, ती गोंयकारांच्या विचारांना मारण्यासाठी दिली आहे. एकजूट दाखविण्याची वेळ आली असून, यापुढे आपल्याला एकजुटीनेच राहावे लागेल. आज आपला ७४वा वाढदिवस असून, पुढील वर्षी सर्वजण माझा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या पद्धतीने साजरा करूया, असे निमंत्रण त्यांनी दिले.