गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला आता वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:49 AM2018-12-11T11:49:25+5:302018-12-11T12:11:41+5:30
विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेली स्थिती पाहता गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला आता वेग येणार आहे हे स्पष्ट झाले.
पणजी : विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेली स्थिती पाहता गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला आता वेग येणार आहे हे स्पष्ट झाले. नेतृत्वहीन बनून आम्ही लोकांकडे जाऊ शकत नाही, अशी भावना गोव्यातील भाजपामध्ये आणि भाजपाच्या काही मंत्री व आमदारांमध्ये प्रबळ बनण्यास आरंभ झाला आहे. भाजपाचे एक मंत्री व एक आमदार तर मुख्यमंत्रीपदासाठी नव्याने फिल्डींग लावू लागले आहेत.
येत्या 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्तीदिन असून त्यावेळी मुख्य शासकीय सोहळ्यात साखळीचे आमदार तथा सभापती डॉ. प्रमोद सावंत हे झेंडावंदन करणार आहेत. एरव्ही हा मान मुख्यमंत्र्यांकडे असतो पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने व ते घराबाहेर पडू शकत नसल्याने गोव्यात सभापती सावंत यांच्याकडे हा मान जात आहे. गेल्या 15 ऑगस्ट रोजीही सावंत यांनीच मुख्य शासकीय सोहळ्यात झेंडा फडकविला होता. दुसऱ्याबाजूने भाजपाच्या एका महत्त्वाकांक्षी मंत्र्याला हे आवडलेले नाही. गोव्यात आता नव्याने नेता बदलला जायला हवा, भाजपाचा नेता कोण व लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यात भाजपाचे नेतृत्व कोण करील याबाबत अधिक स्पष्टता यायला हवी, अशी चर्चा भाजपाच्या काही आमदारांमध्ये व मंत्र्यांमध्येही सुरू झाली आहे.
2012 साली गोव्यात भाजपाचा पराभव झाला होता. त्यावेळी केंद्रात पर्रीकर संरक्षण मंत्री होते. आता नेतृत्व बदल केला नाही तर छत्तीसगडसारखी स्थिती गोव्यात उद्भवेल अशा प्रकारची प्रतिक्रिया भाजपाच्या एका आमदाराने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सोमवारी लोकमतकडे व्यक्त केली. विविध राज्यांचे निवडणूक निकाल हे गोव्यात आमच्या डोळ्यांमध्ये अंजन टाकण्यास पुरेसे आहेत, असे हे आमदार म्हणाले. मुख्यमंत्री सचिवालयात येऊ शकत नसल्याने प्रशासन ठप्प झाल्याची टीका चारहीबाजूंनी होत आहे व या टीकेला भाजपा अजून प्रबळ उत्तर देऊ शकलेला नाही. मगोप, गोवा फॉरवर्ड व अपक्ष हे पर्रीकर सरकारचे घटक आहेत. आता त्यांचे वजन गोवा सरकारमध्ये थोडे वाढेल अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. दुसऱ्या बाजूने विरोधी काँग्रेस पक्ष गोव्यात अधिक आक्रमक होईल याचीही कल्पना भाजपाला सोमवारी आली.