महाराष्ट्रातील गणेश मूर्तींना गोव्यात मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 04:57 PM2018-08-29T16:57:53+5:302018-08-29T16:58:14+5:30
गोव्यातील वाढत्या गणेश मूर्तींची मागणी पुरवण्यासाठी महाराष्ट्रातून खास करुन कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणावर शाडू मातीच्या गणेश मूर्ती आयात केल्या जातात.
म्हापसा : गोव्यातील वाढत्या गणेश मूर्तींची मागणी पुरवण्यासाठी महाराष्ट्रातून खास करुन कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणावर शाडू मातीच्या गणेश मूर्ती आयात केल्या जातात. दिसण्यास आकर्षक व सुबक, वजनाने हलक्या अशा या मूर्ती गोव्यात बनवण्यात येणा-या चिकण मातीच्या मूर्तीपेक्षा कमी किंमतीत विक्री केली जाते. या कारणांमुळे त्यांची मागणी सुद्धा वाढू लागली आहे. विक्रीसाठी आणलेल्या शाडू मातीच्या गणपतीच्या चित्रशाळा गोव्यात विविध ठिकाणी भरू लागल्या आहेत.
मागील वर्षापेक्षा या वर्षी मूर्तींचे प्रमाण बरेच वाढलेले आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार फक्त म्हापसा शहरात किमान सहा हजारांहून जास्त मूर्ती विक्रीस आलेल्या आहेत. श्रावण महिना लागल्या पासून या मूर्ती दाखल व्हायला सुरुवात झाली होती. आता श्रावण महिना संपण्याच्या मार्गावर असल्याने येणा-या मूर्तीचे प्रमाणही बरेच वाढले आहे. विक्रीसाठी ब-याच चित्रशाळा जागोजागी दिसू लागल्या आहेत.
गोव्यात बनवण्यात येणा-या मूर्तीच्या तुलनेत या मूर्तीचे भावही कमी आहेत. साधारणपणे दोन फूट मूर्तीची गोव्यातील किंमत दोन ते अडीच हजारापर्यंत आहे; पण आयात केलेल्या या मूर्तीचे भाव प्रती दोन फुटी दीड हजारापासून ते १८०० रुपयापर्यंत आहेत. मूर्ती आणण्यासाठी लागणारा खर्च धरुन सुद्धा लागू केलेले भाव कमीच आहेत.
विविध आकाराच्या विविध प्रकारच्या या मूर्ती दिसायला आकर्षक व मोहक असतात. त्यामुळे इथल्या मूर्तीकारांनी बनवलेल्या मूर्तीशी त्या जणू स्पर्धाच करीत असतात. श्रावणाची चाहूल लागली की गोव्यातील अनेक विक्रेते महाराष्ट्रात गोव्याच्या शेजारी असलेल्या सावंतवाडी, कुडाळ, महाड, कोल्हापूर, सातारा ते पेण सारख्या भागातून शाडू पासून बनवलेल्या मूर्ती विक्रीसाठी आणतात. पण बहुतांश मूर्ती कोल्हापुरातून आणल्या जातात. गोव्यात बनवल्या जाणाºया चिकण मातीच्या मूर्तीपेक्षा त्या थोड्या वजनाने हलक्या असल्याने त्या उचलण्यास सोयीस्कर ठरत असतात.
आणण्यात येणाºया या मूर्तीत मखरात विराजमान गणेश, फुलातील मूर्ती, नंदी सोबतची मूर्ती, लंबोदर, दगडूशेट, कृष्ण अवतार, शेषनाग, शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणेश, शेष नागावर डुलणारा गणेश, सिंहासनावर आरुढ झालेला गणेश किंवा मुषक वाहना सोबत असलेल्या आदी प्रकाराच्या मूर्तींचा त्यात समावेश आहे. त्यांना मागणीही तशीच असते. गोवेकरही जास्त प्रमाणावर मध्यम आकाराच्या मूर्ती पूजेला लावत असल्याने या आकाराच्या मूर्तींना मागणीची जास्त असते. त्यामुळे जास्त प्रमाणावर अडीच ते चार फुटीपर्यंतच्या मूर्ती आणल्या जातात. अवघ्यास मूर्ती मोठ्या आकाराच्या म्हणजे सहा ते आठ फूटापर्यंत असतात. मात्र निवडक लोक किंवा सार्वजनिक ठिकाणाच्या पूजेसाठी मोठ्या आकाराच्या मूर्ती नेल्या जातात.
तयार मूर्ती दीर्घ प्रवासातून आणणे जोखमीचे काम असल्याने मोठ्या काळजीने त्या वाहनातून आणाव्या लागतात. एक विक्रेता किमान ५०० पासून ते हजारार्पंत मूर्ती विक्रीसाठी आणतात. आणलेल्या मूर्ती नीट सुखरुपपणे त्या उतरवून घेतल्या जातात. प्रवासा दरम्यान एखाद्या मूर्तीवरील रंगावर परिणाम झाला असल्यास किंवा देखभालीची आवश्यकता भासल्यास त्या गोव्यात आणल्यावर दुरूस्त करून नंतर त्यांची विक्री केली जाते. चतुर्थी पूर्वी किमान महिनाभर आगावू या मूर्ती दाखल होत असतात. दाखल झाल्या बरोबर मूर्तीची निवड करुन आरक्षण करण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी व्हायला सुरुवात होते. त्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन काही दिवसाच्या अंतरात त्या आरक्षीत केल्या जात असल्याने संपून जातात. आरक्षीत केलेल्या मूर्ती नंतर चतुर्थीच्या पूर्वसंध्येला घरी नेल्या जातात.
सुदेश बर्वे या विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील बापट कॅम्पातील शिवाजी आर्टस, सुनील म्हात्रे या मूर्तीकाराकडून मूर्ती आणल्या जातात. तेथील मूर्ती मार्च महिन्यापर्यंत बनवून तयार झालेल्या असल्याने तेथे जाऊन त्यांची आगाऊ नोंदणी करावी. गोवेकरांच्या मागणीनुसार सुद्धा मूर्ती बनवण्यावर भर दिला जातो. काही मूर्तीकारांनी दिलेल्या माहितीनुसार या मूर्तीसाठी किमान सहा महिने आगाऊ नोंदणी करावी लागते. महाराष्ट्रातील मूर्तीकार चतुर्थीपूर्वी किमान सहा महिने मूर्ती बनवत असल्याने वेळीस नोंदणी करणे सोयीस्कर ठरत असते.