सांगोल्डातील 'ती' सर्व घरे पाडली, पोलीस बंदोबस्त कारवाई
By काशिराम म्हांबरे | Published: April 13, 2024 03:51 PM2024-04-13T15:51:48+5:302024-04-13T15:52:34+5:30
कारवाईच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राहिलेल्या सर्व ७ घरांवर जेसीबी फिरवून ती सर्व मोडून टाकण्यात आली.
म्हापसा : सांगोल्डा येथील कोमुनिदादच्या जागेतील सर्व बेकायदेशीरपणे २२ घरे पाडण्यात आली. काल शुक्रवारी रात्रीपर्यंत एकूण १५ घरांवर कारवाई करण्यात आलेली. कारवाईच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राहिलेल्या सर्व ७ घरांवर जेसीबी फिरवून ती सर्व मोडून टाकण्यात आली.
आज दुसऱ्या दिवशी कारवाई दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र पहिल्या दिवशी प्रमाणे लोकांकडून दुसऱ्या दिवशी प्रतिकार झाला नाही. कारवाई होणार म्हणून घरातील सामान बाहेर काढण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर उत्तर गोवा कोमुनिदादच्या प्रशासकाकडून ही कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान, आज कारवाई दरम्यान स्थानिक आमदार केदार नाईक यांनी घरे पाडण्यात आलेल्या लोकांची भेट घेतली. कारवाईत बेघर झालेल्या लोकांचे पुर्नवसन करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी यावेळी दिली. बेघर झालेल्या लोकांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. तसेच लोकांना निवाऱ्यासंदर्भातील पर्यायावर चर्चा केली जाणार असल्याचे केदार नाईक यांनी पत्रकारांना सांगितले.
पहिल्या दिवशीच्या कारवाईनंतर बेघर झालेल्या त्या लोकांनी शुक्रवारची रात्र त्याच ठिकाणी काढली. घरातून काढण्यात आलेले त्यांचे सामान ठेवण्यासाठी पर्यायी जागा नसल्याने परिसरात सर्वत्र विखूरलेल्या अवस्थेत पडून होते. तेथील महिलांबरोबर लहान मुलांचे पचंड हाल झाले होते. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारच्या रात्री अन्न पुरवल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.