आता गोव्याच्या वास्को - कुळे प्रवासी रेल्वे मार्गावर धावणार ‘डेमू ट्रेन’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 08:10 PM2021-08-26T20:10:38+5:302021-08-26T20:14:21+5:30
दक्षिण पश्चिम रेल्वेने वास्को - कुळे रेल्वे मार्गावर ‘डेमू’ बनावटीची ट्रेन प्रवासी रेल्वे सेवेसाठी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: दक्षिण पश्चिम रेल्वेने वास्को - कुळे रेल्वे मार्गावर चालणारी ‘कंन्वेंश्नल रेक’ बनावटीची ट्रेन हटवून गुरूवार (दि.२६) पासून या मार्गावर ‘डेमू’ (डिझेल इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) बनावटीची ट्रेन प्रवासी रेल्वे सेवेसाठी सुरू केली आहे. वास्को - कुळे मार्गावर ४२ कोटी रुपये खर्च करून दोन ‘डेमू ट्रेन’ सुरू केल्यापासून गुरूवारी सकाळी ७.३० वाजता वास्को रेल्वे स्थानकावरून पहिल्यांदाच ‘डेमू ट्रेन’ प्रवाशांना घेऊन कुळे जाण्यासाठी रवाना झाली. ‘डेमू ट्रेन’ मध्ये प्रवाशांना आणखीन चांगल्या सुविधा उपलब्ध असून दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाच्या मार्गावरील ही ‘डेमू ट्रेन’ पहिलीच प्रवासी रेल्वे सेवा ठरलेली आहे.
वास्को ते कुळे व कुळे ते वास्को या रेल्वे मार्गावर यापूर्वी ‘कंन्वेंश्नल रेक’ बनावटीची ट्रेन प्रवासी रेल्वे सेवा द्यायची. दक्षिण पच्छीम रेल्वेने गुरूवारपासून ती ट्रेन हटवून यामार्गावर प्रवासी रेल्वे सेवा देण्यासाठी ‘डेमू ट्रेन’ घातली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना आणखीन चांगल्या सुविधा असण्याबरोबरच ही ट्रेन जास्त प्रवाशांना नेण्याची क्षमता ठेवते. पूर्वीच्या ट्रेनच्या एका डब्यात ९० प्रवासी नेण्याची क्षमता असून ‘डेमू’ ट्रेनच्या एका डब्यात (कार कोचीस) १०५ प्रवासी नेण्याची क्षमता आहे. या ट्रेनमध्ये एकूण आठ डब्बे (कार कोचीस) असणार असल्याची माहीती दक्षिण पच्छीम रेल्वेच्या जनसंपर्क विभागातून प्राप्त झाली. ‘डेमू ट्रेन’ पूर्वीच्या ट्रेन पेक्षा जास्त गतीने प्रवास करण्याची क्षमता ठेवते. तसेच या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूने ‘ड्रायव्हींग कॅबीन’ (ट्रेन चालवण्याची सुविधा) असल्याने दोन्ही बाजूने ही ट्रेन चालवू शकतात, ज्यामुळे वेळ वाचणार. ४२ कोटी खर्च करून घातलेल्या या दोन ‘डेमू ट्रेन’ दक्षिण पच्छीम रेल्वेच्या हुबळी विभागातील या बनावटीच्या पहील्या प्रवासी रेल्वे सेवा ठरलेल्या आहेत.
आता ‘डेमू’ ट्रेन दिवसाला तीन वेळा वास्को तर तीन वेळा कुळे ला प्रवाशांना घेऊन जाणार
वास्को - कुळे व कुळे - वास्को या रेल्वे मार्गावर पूर्वी दिवसाला दोन प्रवासी रेल्वे सुविधा उपलब्ध होत्या, त्यात गुरूवारपासून वाढ करून आता दिवसाला तीन प्रवासी रेल्वे सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तिसरी प्रवासी रेल्वे आता कुळे रेल्वे स्थानकावरून दररोज दुपारी १२.२० वाजता निघाल्यानंतर ती ट्रेन दुपारी २.१० वाजता वास्कोला पोचणार. वास्को रेल्वे स्थानकावरून दुपारी १.०५ वाजता तिसरी प्रवासी रेल्वे निघाल्यानंतर ती दुपारी ३ वाजता कुळेला पोचणार अशी माहीती दक्षिण पच्छीम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्राप्त झाली.