डेंग्यूचे थैमान; १६ मृत्यू, आरोग्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय बैठकीत आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:23 PM2023-09-26T12:23:38+5:302023-09-26T12:26:24+5:30
ताप येत असल्यास थांबू नका, त्वरित रक्त तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरू करा.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात डेंग्यू तापाने थैमान घातल्याने शासकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी काल सर्व आरोग्य केंद्रांचे अधिकारी, डॉक्टर्स यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूच्या १६ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता रुग्णांसाठी लवकरच एसओपी जारी केली जाईल, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले, ताप येत असल्यास थांबू नका, त्वरित रक्त तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरू करा. डेंग्यूमुळे शरीरातील 'प्लेटलेटस्' कमी होऊन ते जिवावर बेतू शकते. वास्को, चिंबल, पणजी डेंग्यूच्या बाबतीत हॉटस्पॉट बनले आहेत. कळंगूटमध्येही १०१ रुग्ण आढळले आहेत. हळदोण्यात १३ डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. बैठकीत याचा आढावा घेण्यात आला.
डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या प्रत्येक हॉटस्पॉटवर आरोग्य अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष असणार आहे. डेंग्यूच्या बाबतीत हयगय करू नये. गोमेकॉतून ज्या १६ संशयित डेंग्यू रुग्णांच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे, त्याची पूर्णपणे छाननी होईल. मृतांच्या बाबतीत प्रथम दर्शनी पाच ते सहा अशी प्रकरणे आढळली की त्यांना अन्य आजारही होता. तीन ते चारजण मद्यपी होते.
अधिकारी म्हणतात...
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये राज्यात डेंग्यूचे ३११९ संशयित रुग्ण आढळले. पैकी ७२ जणांना डेंग्यू झाल्याचे कन्फर्म झाले. चालू सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण घटले. १३९२ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले, त्यापैकी ८० जणांना डेंग्यू झाल्याचे कन्फर्म झाले आहे.
हळदोण्यात १३ बाधित
हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात डेंग्यूचे १३ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य केंद्राच्या डॉ. रोशन नाझारेथ यांनी दिली. जानेवारीपासून जुलैपर्यंत ३६ संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यात फक्त ७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यात २० संशयितांची चाचणी केली. त्यात फक्त डेंग्यूचे २ रुग्ण आढळून आले तर सप्टेंबर महिन्यात २० रुग्णांची चाचणी घेतल्यानंतर ४ रुग्ण आढळून आल्याचे डॉ. नाझारेथ म्हणाल्या.
कळंगुटमध्ये १०१ रुग्ण
पर्यटन व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या कळंगूट परिसरात सध्या डेंग्यूसदृश तापाने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात पंचायतीने डेंग्युच्या चाचणीसाठी मोफत तपासणी मोहीम हाती घेतली. त्यामध्ये ४०० हून जास्त व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून यातील १०१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी दिली आहे.