मुरगाव तालुक्यात डेंग्यूमुळे घबराट; वर्षभरात तीन पुरुषांसह एका महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 02:43 PM2019-12-31T14:43:26+5:302019-12-31T14:43:30+5:30
वास्को व परिसरात पसरणाऱ्या डेंग्यूला आळा घालण्यासाठी शहरी आरोग्य केंद्राने विविध प्रकारची पावले उचलली.
वास्को: २०१९ सालच्या सुरुवातीपासूनच दक्षिण गोव्यात असलेल्या मुरगाव तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात डेंग्यू पसरण्यास सुरुवात झाल्याने संपूर्ण वर्षभर डेंग्यू तापाची दहशत नागरिकांमध्ये होती.
वर्षाच्या सुरुवातीपासून १५ डिसेंबरपर्यंत मुरगाव तालुक्यातील चिखली उपजिल्हा इस्पितळात डेंग्यूसदृश तापावर ११३४ रुग्णांनी उपचार घेतला. याव्यतिरिक्त वास्को शहरातील बहुतेक सर्वं इस्पितळांत मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश तापाच्या रुगणांवर उपचार करण्यात आले. २०१९ साली वास्कोत डेंग्यूसदृश तापावर उपचार घेत असताना चार जणांचा मृत्यू झाला. यात तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश होता.
वास्को व परिसरात पसरणाऱ्या डेंग्यूला आळा घालण्यासाठी शहरी आरोग्य केंद्राने विविध प्रकारची पावले उचलली. मात्र, याचा जास्त फायदा झाला नसल्याचे दिसून आले. डेंग्यूवर आळा घालण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राचे अधिकारी विविध ठिकाणी गेले असता त्यांना काही रहिवासी बॅरलमध्ये पाणी भरुन ते उघडे ठेवत असल्याचे दिसून आले. अशा प्रकारे पाणी उघडे ठेवल्यास याच्यात निर्माण होणाऱ्या डासांमुळे डेंग्यू पसरत असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी जागृती केल्यावर नागरिकांनी पाणी झाकून ठेवण्यास प्रारंभ केला. मात्र, असे अनेक लोक होते ज्यांनी वेळोवेळी जागृती करुनसुध्दा विविध सूचनांचे पांलन केले नसल्याची माहिती वास्को आरोग्य खात्याच्या प्रमुख डॉ. रश्मी खांडेपारकर यांनी दिली.
ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात डेंग्यूच्या प्रमाणात बरीच वाढ झाल्याचे दिसून आले. या चार महिन्यांत वास्को व जवळपासच्या भागातील ८४० नागरिकांना डेंग्यू तापावर उपचार घेण्यासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती या इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली. चिखली उपजिल्हा इस्पितळाबरोबरच वास्कोतील अन्य विविध इस्पितळांत डेंग्यू तापावर उपचार करण्यासाठी अनेक रुग्णांना या काळात दाखल करण्यात आले होते. या काळात डेंग्यूचे प्रमाण वाढण्यामागचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर उघड्यावर टाकलेल्या नारळाच्या करवंट्या, कुंड्या यांमध्ये पाणी साचून डेंग्यूच्या डासांचा फैलाव झाला.
वास्को व जवळपासच्या भागात १५ डिसेंबरपर्यंत डेंग्यूसदृश ताप आलेल्या १,१३४ रुग्णांवर चिखली उपजिल्हा इस्पतळात उपचार करण्यात आले. याव्यतिरिक्त अन्य विविध इस्पितळांतही मोठ्या प्रमाणात डेंग्यू तापाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. नवेवाडे भागात या वर्षी मोठ्या प्रमाणात डेंग्यू झालेले रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त मांगोरहिल, बायणा, सडा, वाडे, चिखली अशा विविध भागातून सुध्दा डेंग्यू झालेले रुग्ण सापडले. पुरुष -महिलांसह लहान मुलांना सुध्दा या वर्षी मोठ्या प्रमाणात डेंग्यूची लागण झाली. डेंग्यूला आळा घालण्यासाठी वास्को आरोग्य केंद्राबरोबरच मुरगाव पालिकेने सुध्दा विविध पावले उचलली. औषध फवारणी केली.
डेंग्यूसदृश तापाच्या चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची आकडेवारी-
जानेवारी- 39
फेब्रुवारी- 10
मार्च- 16
एप्रिल- 34
मे- 39
जून- 46
जुलै- 71
ऑगस्ट- 195
सप्टेंबर- 268
ऑक्टोबर- 243
नोव्हेंबर- 134
डिसेंबर (15 पर्यंत) 39