डेंग्यूचा राज्यभर 'डंख'; डिचोलीसह काणकोण तालुक्यातही ठिकठिकाणी आढळले रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 01:28 PM2023-09-28T13:28:42+5:302023-09-28T13:29:43+5:30
डिचोली येथे आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी याबाबत माहिती दिली. या
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली/काणकोण : डिचोली शहरात डेंग्यूचे बारा रुग्ण सापडले आहेत. त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी डिचोली आरोग्य केंद्रातर्फे खबरदारी घेतली जात आहे. बुधवारी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी आरोग्य केंद्रास भेट देऊन आढावा घेतला.
डिचोली येथे आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करणे, डासांची पैदास केंद्रे हेरून औषध फवारणी करणे आदींबाबत चर्चा झाल्याचे तसेच तातडीने उपाययोजनांसाठी सूचना केल्याचे आमदार डॉ. शेट्ये यांनी सांगितले. डेंग्यू तपासणी किट जादा उपलब्ध करणे, ताप आल्यानंतर तीन दिवसांनी तपासणी करून रक्त चाचणी करणे गरजेचे आहे. पालिकेने आरोग्य केंद्रातर्फे विविध ठिकाणी तपासणी तसेच सांडपाण्याचा योग्य निचरा याची तपासणी करण्याचेही आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले.
काणकोणात सहा संशयित रुग्ण
काणकोण तालुक्यात डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील काहींवर काणकोण इस्पितळात उपचार सुरू आहेत. ज्या भागात हे संशयास्पद रुग्ण आढळले, त्याठिकाणी जंतुनाशकाचा फवारा मारणे, घराशेजारील डबकी व पाण्याची तपासणी, पाणी साचलेले आढळल्यास तो भाग साफ करणे अशी कामे काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राकडून सुरू करण्यात आली आहेत. केंद्राचे सॅनिटरी निरीक्षक प्रणय नाईक यांनी ही माहिती दिली.
हॉटस्पॉट जागांवर पथके
रुग्ण झपाट्याने वाढले असल्याने आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सर्व हॉटस्पॉटवर पुन्हा तपासणी केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केली जात आहे. तसेच सर्व ठिकाणांवर फवारणी केली जात आहे. तसेच लोकांमध्ये जागृती केली जात आहे. राज्यात गेल्या आठवडाभरात २०० संशयास्पद डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धास्ती वाढली आहे.
गेल्या आठवडाभरात राज्यात २०० च्या आसपास संशयास्पद डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने यावर कडक पावले उचलली आहे. आरोग्यमंत्र्यांनी सर्व हॉटस्पॉट जागांची खास पाहणी केली जाणार असून डेंग्यू पूर्ण नष्ट करण्यावर भर दिला जाणार आहे, असे सांगितले. आरोग्य खात्याचे कर्मचारी तसेच अधिकारी याकडे लक्ष देत आहे.
शहरी भागात सर्वाधिक फैलाव
राज्यात वास्को परिसर, वाडे, फातोर्डा, म्हापसा परिसरात, कलंगुट, ताळगाव, मेरशी, चिंबल, सातांक्रूझ या भागात डेंग्यूचे संशयास्पद तसेच सक्रीय रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. यासाठी आरोग्य खात्याचे सर्व कर्मचारी तसेच अधिकारी या जागांवर स्वतः पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेत आहे. लोकांना जागरूक केले जात आहे, असे आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.
तक्रारी कमी होतील
राज्यात डेंग्यूबाबत उपाययोजना सुरू असून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत डेंग्यूच्या तक्रारी कमी होतील, असा विश्वास डॉ. कल्पना महात्मे यांनी व्यक्त केला.