देवस्थानच्या पुजाऱ्याला जामीन नाकारला, मंगेशी विनयभंग प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 08:27 PM2018-08-07T20:27:22+5:302018-08-07T20:28:01+5:30
विनयभंग प्रकरणात अडकलेले मंगेशी देवस्थानचे पुजारी धनंजय भावे याला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात धाव घेतली. पण
पणजी : विनयभंग प्रकरणात अडकलेले मंगेशी देवस्थानचे पुजारी धनंजय भावे याला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात धाव घेतली. पण, अंतरीम अटकपूर्व जामीन देण्यास पणजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही नकार दिला.
सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिका खंडपीठाने दाखल करून घेऊन फोंडा पोलिसांना व सरकारलाही नोटीस बजावली आहे. त्याच्याविरुद्ध दोन प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असल्यामुळे दोन्ही प्रकरणात त्याने अटकपूर्व जामीनसाठी दोन वेगवेगळ्या याचिका खंडपीठात सादर केल्या होत्या. त्या दोन्हीही दाखल करून घेण्यात आल्या आहेत. या प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करायला फोंडा पोलिसांनी वेळ मागितला आहे. एक आठवड्यात पोलीस प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत. या प्रकरणात निवाडा होईपर्यंत अंतरीम अटकपूर्व जामीन देण्याची मागणी संशयिताच्या वकिलाने केली होती. परंतु, ही मागणी खंडपीठाने फेटाळल्यामुळे संशयिताला केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर संशयित बेपत्ता झाल्याचे फोंडा पोलिसांचे म्हणणे आहे.