मूत्रपिंड विभाग निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 01:52 AM2017-02-15T01:52:58+5:302017-02-15T01:54:09+5:30
पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील (गोमेकॉ) मूत्रपिंड विभागच (नेफ्रोलॉजी) निकामी झाला आहे. या विभागाचे
पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील (गोमेकॉ) मूत्रपिंड विभागच (नेफ्रोलॉजी) निकामी झाला आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. तिवारी आणि डॉ. अमोल म्हालदार या दोघांनीही गोमेकॉला रामराम ठोकल्यानंतर सरकारने किंवा गोमेकॉ व्यवस्थापनाने पर्यायी व्यवस्थाच केली नाही. परिणामी किडनी रोपणाच्या शस्त्रक्रिया अडून राहिल्या आहेत.
गोमेकॉत यापूर्वी किडनी रोपणाच्या १३ ते १४ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. गेल्या दोन वर्षांत तेरा-चौदा पुरुष व महिलांना तसेच युवकांनाही गोमेकॉत किडनी रोपण करून घेता आले. प्रारंभी एक-दोन शस्त्रक्रियांवेळी मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टर आणले गेले व किडनी रोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले गेले. नंतरच्या सर्व शस्त्रक्रिया गोव्यातीलच डॉक्टरांनी केल्या. त्या यशस्वीपणे पार पडल्याचे श्रेय सरकारने घेतले. आरोग्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा तसेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही संबंधित डॉक्टरांचे यापूर्वी कौतुक केले आहे; पण नेफ्रोलॉजी विभागच आता नेस्तनाबूत झालेला असून हा विभागच शिल्लक राहिलेला नाही, याची गंभीर दखल अजूनही सरकारने घेतलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
किडनी रोपणाच्या शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी अगोदर नेफ्रोलॉजी विभाग योग्य स्थितीत असणे गरजेचे असते. डॉ. तिवारी आणि डॉ. अमोल म्हालदार यांनी गोमेकॉच्या सेवेचा निरोप घेतल्यानंतर हा विभागच अस्तित्वहीन झाला. त्या विभागातील महत्त्वाची पदे रिकामी होण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. संबंधितांचे राजीनामे स्वीकारून त्यांना सेवामुक्त करण्यापूर्वीही पर्यायी व्यवस्था झाली नाही आणि नंतरही पदे भरण्यासाठी जलदगतीने पावले उचलली गेली नाहीत. जर पदे भरली असती, तर किडनी रोपणाच्या आणखीही शस्त्रक्रिया एव्हाना झाल्या असत्या, असे सूत्रांनी सांगितले. दोन-तीन महिन्यांपासून ही पदे रिक्त आहेत.
(खास प्रतिनिधी)