ख्रिसमस सुरु होऊनही गोव्यात पर्यटकांची संख्या कमीच, 30 टक्क्यांनी घट झाल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 06:34 PM2017-12-25T18:34:10+5:302017-12-25T18:34:36+5:30
कदाचित जीएसटीचा परिणाम असू शकेल. गोव्यात ख्रिसमस सुरु झाला असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांचे आगमन रोडावले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के पर्यटक कमी आल्याचा दावा पर्यटन क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांनी केला आहे.
मडगाव : कदाचित जीएसटीचा परिणाम असू शकेल. गोव्यात ख्रिसमस सुरु झाला असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांचे आगमन रोडावले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के पर्यटक कमी आल्याचा दावा पर्यटन क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांनी केला आहे. मात्र राज्य पर्यटन खात्याने या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात गोव्यात कमीत कमी चार लाखांच्या आसपास देशी-विदेशी पर्यटक येतील अशी खात्री व्यक्त केली आहे.
गोवा ट्रॅव्हल व टुरिझम संघटनेचे अध्यक्ष सावियो मासियस यांच्या दाव्याप्रमाणे, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30 टक्के पर्यटक गोव्यात कमी आलेले आहेत. जीएसटीमुळे पर्यटन खर्चीक झाले आहे. याशिवाय विमानाच्या वाढलेल्या तिकीटेही त्याला कारणीभूत ठरली आहेत. गोव्यातील पर्यटन विशेषत: देशी पर्यटकांसाठी महागडे ठरले आहे.
स्थानिक उद्योजकांनी जरी विरोधी सूर लावला असला तरी पर्यटन संचालक मिनीन डिसोझा यांच्या मते, येत्या दोन तीन दिवसात स्थिती बदलणार आहे. आताच पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. या चालू आठवडय़ात गोव्यात येणा-या पर्यटकांची संख्या चार लाखांच्या वर जाईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. गोव्यात 25 डिसेंबरपासून नाईट पार्टीज् सुरु झाल्या असून 31 डिसेंबर्पयत त्या चालू रहाणार आहेत.
डिसेंबर महिन्यात गोव्यात सनबर्न, सुपरसॉनिक सारखे इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सव आयोजित केले जायचे त्यामुळे मोठय़ा संख्येने देशी पर्यटक या काळात गोव्यात यायचे. मात्र यंदा या दोन्ही महोत्सवाचे आयोजन होणार नाही. गोव्यात पर्यटक कमी येण्याचे कारण हेही असण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी 27 ते 29 डिसेंबर या दरम्यान वागातोर येथे ‘टाईमआऊट 72’ हे इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिव्हल आयोजित होणार असून त्यानिमित्त गोव्यात पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.