“एवढे दरोडे पडले तरी, देशाची सांस्कृतिक श्रीमंती कमी झाली नाही”: शरद पोंक्षे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 09:09 AM2023-08-26T09:09:52+5:302023-08-26T09:12:33+5:30
हिंदूमधील जातीजातींवरून दरी मोठी करण्यासाठी खतपाणी राजकारणी घालत आहेत. जो इतिहास विसरतो, त्याचा भूगोल बिघडलेला असतो, असे शरद पोंक्षे म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : भारताचा इतिहास आजचा असो किंवा कालचा. भारत हा हिंदूंचा देश आहे. हिंदू धर्मियांचे हे राष्ट्र आहे, हे सत्य नाकारता येत नाही. आपल्या भारतामध्ये पाचव्या, सहाव्या शतकापासून आक्रमण होत आहे, कारण आपल्या देशात काही लुटण्यासारखे आहे म्हणून. एवढे दरोडे पडले तरीही आपल्या देशाची श्रीमंत संस्कृती अजून कमी होऊ शकली नाही, मत व्याख्याते तसेच लेखक शरद पोंक्षे यांनी मांडले.
फोंडा येथील राजीव कला मंदिरामध्ये चतुरंग प्रतिष्ठानतर्फे 'स्वातंत्र्याचे पूर्व रंग' कार्यक्रमाच्या अंतर्गत भारताचे स्वातंत्र्य काल आज उद्या' या विषयावर शरद पोंक्षे बोलत होते. भारताची हिंदू संस्कृती खूप मोठी आहे हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. भारत हा देशात पराक्रमी, वीर पुरुष, संत, विज्ञानवाद्यांची. देव देवतांची भूमी आहे. संपूर्ण जगाला ज्ञानविज्ञान देणारी ही संस्कृती आहे. आपली वेदांची पुस्तके लुटून घेऊन जाऊ शकतात. मात्र, या वेदांमध्ये सांगितलेले आहे व लोकांनी आपल्या आचरणामध्ये अनुकरण केले आहे ती संस्कृती कसे लुटू नेऊ शकतील? असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पवित्र संतांनी भारतभूमी मध्ये का जन्म घेतला, श्रीकृष्ण, श्रीराम तसेच अन्य संतांनी या भूमीत का जन्म घेतला हा इतिहास जाणन घ्यावा. प्रत्येक माणसाची एक जगण्याची फिलॉसॉफी आहे. मूलभूत तत्वे आहेत. ती तत्वे इथे जन्माला आली. भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या. आपण जगाला शून्य दिला. त्यामुळे गणित तयार होऊ शकलं.
जाती कोणी तयार केल्या याचा अभ्यास न करता, इतिहास न जाणता खोटे पसरवण्याचे गलिच्छ काम स्वातंत्र्यानंतर करण्यात आले. आजही ते विकोप्याला गेले आहे. उद्याचा भारत घडवायचा असल्यास जातीमधील भेदभावांवर पहिल्यांदा प्रहार करावा लागेल, असेही पोंक्षे म्हणाले.
इतर धर्माचे लोक संकट आल्यावर एकत्र येऊन लढा देतात. मात्र हिंदूवर कोणतेही संकट आले तर एकोपा नसतो. वज्रमूठ होण्यासाठी सर्व बोटे एकत्र यावी लागतील. हिंदूमधील जातीजातींवरून दरी मोठी करण्यासाठी खतपाणी राजकारणी घालत आहेत. जो इतिहास विसरतो, त्याचा भूगोल बिघडलेला असतो, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आपली सर्वांची एकच संस्कृती आहे व ती म्हणजे हिंदू संस्कृती. आपल्या देशात कोणी दत्ताचे, कोणी गणपती तर कोणी महादेवाचे भक्त आहेत.. मात्र, आपली नाळ ही एकच आहे व ती म्हणजे हिंदू संस्कृतीची. इतरांना माणुसकीने व प्रेमाने वागण्याची संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती आहे. आपल्याला उद्याचा भारत घडवायचा असल्यास आपल्या हातात काही गोष्टी आहेत, ते म्हणजे मतदान. मतदानातून आपण अनेक गोष्टी घडवू शकतो. बदलू शकतो, यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जो हिंदू हिताचा विचार करेल तो देशावर राज्य करेल. हा दृढ निश्चय हिंदू लोकांनी करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.