डिटेन्शन सेंटरमुळे राज्यातील विदेशींच्या गुन्हेगारीवर अंकुश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:51 PM2023-12-22T12:51:46+5:302023-12-22T12:52:58+5:30
गुन्हेगारीत ६० टक्के बाहेरील लोकांचा समावेश: अधीक्षक वाल्सन.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'विदेशी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी म्हापसा येथे स्थापन करण्यात आलेले स्थानबद्धता केंद्राचा खूप चांगला परिणाम दिसून आला आहे. विदेशी संशयितांची गोव्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यास हे केंद्र कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे राज्यात आज विदेशींची गुन्हेगारी संपली आहे,' असे उत्तर गोव्याचे अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले. 'लोकमत'शी केलेल्या अनौपचारिक वार्तालापात ते बोलत होते.
गोव्यात होणाऱ्या गुन्ह्यात राज्याबाहेरील लोकांचा ६० टक्क्यांहून अधिक समावेश आढळून आला आहे. शेजारील राज्यातील नागरिक यात अधिक असल्याचेही ते म्हणाले. अधीक्षक वाल्सन म्हणाले की, १२ वर्षापूर्वी पर्वरी येथे महामार्गावर घडलेल्या प्रकाराचा बोध घेऊन पोलिस प्रशासनाने हा विषय अत्यंत गांभीर्याने हाताळला. अशा समस्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त केला आहे. त्यामुळे राज्यात आज गुन्हेगारी वृत्तीच्या विदेशींचा जमाव एकत्र येऊ शकत नाही' असे त्यांनी सांगितले.
'राज्यात गुन्हे वाढलेले नाहीत. परंतु गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रमाणही वाढले आहे, अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच खबरदारी घेऊन ते घडू न देण्याचे काम खूप वेळा करण्यात आले आहे. जे गुन्हे होतात, त्यात शेजारील राज्यांतील संशयितांचा समावेश अधिक आढळून आला आहे' असे अधीक्षक वाल्सन यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'खात्याच्या गुन्हेविषयक आकडेवारीनुसार राज्यात गुन्हे कमी झाल्याचे दर्शवित आहेत. परंतु अलीकडे घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याची माहिती सोशल मीडियावरून सर्वांपर्यंत पोहोचत असल्यामुळे त्यांचे प्रमाण मोठे असल्याचे चित्र बनत आहे.
सायबर जागृती झाली, पण...
'राज्यात सायबर गुन्ह्यांबाबत खूप चांगली जागृती झाली आहे. त्यामुळे ओटीपी मिळवून फसवणूक करण्यचे प्रकार आता फार कमी झाले आहे. राज्यातील लोक आता ओटीपी कोणालाही देत नाहीत. परंतु सायबर गुन्हेगारांच्या मोडस ओपरेन्डी वेगाने बदलतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करीत असतात. त्यामुळे मोबाइल हाताळताना खूप सावध राहण्याची गरज आहे' असे मत पोलिस अधीक्षक वाल्सन यांनी व्यक्त केले.