देव बोडगेश्वराला यावर्षी 'सोन्याचे कडे'; चांदीची उत्सव मूर्ती अर्पण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 09:10 AM2024-01-18T09:10:19+5:302024-01-18T09:11:37+5:30
७०० ग्रॅम वजन सोन्याचे दोन कडे, २ फूट उंच, ७ किलो वजन चांदीची उत्सव मूर्ती.
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : म्हापशातील सुप्रसिद्ध तसेच जागृत देवस्थान, राखणदार म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री देव बोडगेश्वराला मूर्ती आनंद भाईडकर प्रतिष्ठापनेच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त दोन सोन्याचे कडे आणि चांदीची उत्सव मूर्ती देवस्थान समिती अर्पण करणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली.
पुढील आठवड्यात दि. २३ रोजी देव बोडगेश्वराच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळा होणार आहे. तर २४ जानेवारीपासून महाजत्रोत्सव सुरू होईल. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष भाईडकर म्हणाले की, गेल्यावर्षी देवाला एक किलो वजनाचा सोन्याचा दांडा अर्पण करण्यात आला होता. यंदा वर्धापनदिनानिमित्त देवाची चांदीची उत्सव मूर्ती विधीयुक्त पद्धतीने स्थापन केली जाणार आहे. पूर्वीची मूर्ती पंचधातूची होती. त्याजागी आता चांदीची अंदाजे २ फूट उंच, ७ किलो वजनाची मूर्ती स्थापन केली जाईल. तसेच ७०० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे कडे त्याचदिवशी देवाला अर्पण केले जातील.
भाईडकर म्हणाले की, 'जत्रोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. दररोज देवस्थान समितीकडून आढावा घेतला जात आहे. लवकरच जिल्हाधिकारी, आमदार जोशुआ डिसोझा, वाहतूक पोलिस, पोलिस निरीक्षक तसेच इतर विविध संबंधित घटकांची संयुक्त बैठक होईल. जत्रोत्सव सर्व म्हापसावासीयांना सोबत घेऊन साजरा केला जाईल.'
आधी पैसे घेणार नंतर स्टॉल देणार
जत्रोत्सवानिमित्त स्टॉल वितरण करण्यास सुरुवात केली आहे. एक हजाराहून जास्त स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. स्टॉलचे वितरण करण्यापूर्वी संबंधित स्टॉलधारकांकडून रक्कम जमा करून घेतली जाईल. बऱ्याचवेळा स्टॉल्सधारकांकडून वेळेत रक्कम जमा केली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.