मगोच्या बॅनरपेक्षा विकास महत्त्वाचा: मंत्री सुदिन ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:10 IST2025-04-08T13:10:12+5:302025-04-08T13:10:51+5:30
मगो पक्षाचे काम अजूनही सुरू असल्याचा दावा मंत्री ढवळीकर यांनी केला.

मगोच्या बॅनरपेक्षा विकास महत्त्वाचा: मंत्री सुदिन ढवळीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : पेडणे तालुक्यात तीन वर्षांच्या कार्यकाळात मगो पक्षाच्या बॅनरखाली किती कार्यक्रम झाले? किंवा या बॅनरखाली कार्यक्रम करताना अडचण येते काय? असा प्रश्न पत्रकाराने वीज मंत्री तथा मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांना विचारला असता, त्यांनी बॅनरऐवजी विकास महत्त्वाचा आहे, असे सांगून टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.
मगो पक्षाचे काम अजूनही सुरू असल्याचा दावा मंत्री ढवळीकर यांनी केला. खुटवळ पेडणे येथे एका मंदिराचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, मगो पक्षाच्या बॅनरखाली त्या मंदिराचे काम सुरू आहे काय? त्यावर मात्र मंत्री ढवळीकर म्हणाले, मगो पक्षाच्या बॅनरऐवजी विकास महत्त्वाचा आहे.
मांद्रेचे उमेदवार जीतच?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मांद्रे येथील भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी निवडणुकीत भाजपचाच उमेदवार आमदार म्हणून निवडून येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. त्यावर पत्रकाराने मंत्री ढवळीकर यांना प्रश्न केला की, तुम्ही या मतदारसंघात मगोतर्फे दावा करणार आहात का? यावर मात्र मंत्री ढवळीकर यांनी उत्तर देण्याचे टाळले. आगामी काळात मगोचाच उमेदवार म्हणून आमदार जीत आरोलकर हेच असणार, असाही दावा त्यांनी केला.