खाण लीजमधून देवी लईराईचे मंदिर वगळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:46 AM2023-12-28T11:46:19+5:302023-12-28T11:46:55+5:30
परंतु खाणी सुरू करण्यात कोणतेही अडथळे आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी लोकांना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: शिरगावातील श्री लईराई देवीचे प्रसिद्ध मंदिर खाण लीजमधून बाहेर काढणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे.
अलीकडेच ज्या खाण लीज क्लस्टर्डचा खाण खात्याकडून लिलाव करण्यात आला होता, त्या डिचोलीतील शिरगाव खाण लीज क्षेत्रात शिरगांवचे दैवत प्रसिद्ध लईराई देवीच्या देवळाचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे लोकांनी या खाण लीजला प्रखर विरोध केला होता. मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टता आणताना लहराई देवीचे मंदिर खाण लीजमधून वगळण्यात येणार आहे मंदिरासोबतच परिसरातील जागाही देवस्थानाला देण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु खाणी सुरू करण्यात कोणतेही अडथळे आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी लोकांना केले.
विरोध चुकीचा
राज्य सरकार खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्नरत असताना काहीजण विनाकारण खो घालत असून त्यांना जाब विचारण्याची गरज आहे. प्रत्येक बाबतीत विरोध चुकीचा आहे. विरोधामुळे विकासाला बीक बसते. त्याचबरोबर कृषी बाबतीत दावे निकालात काढण्यासाठी जाचक अटी शिथील करून दिलासा देण्याचा प्रयत्ल आहे. त्यासाठी संयुक्त्त बैठक घेवून हा प्रश्न निकालात काढण्यात येईल. असे त्यांनी स्पष्ट केले.