पणजीत महापौरांच्या मोटारीला डीजीपींनी ठोकले क्लॅम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2016 07:23 PM2016-06-30T19:23:58+5:302016-06-30T19:23:58+5:30
महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या मोटारीने डबल पार्किंग करुन इतर वाहनांना अडथळा आणल्याच्या सबबीखाली पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या आदेशावरुन क्लॅम्प ठोकण्यात आले.
- २00 रुपये दंड; महापौर संतप्त
पणजी : महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या मोटारीने डबल पार्किंग करुन इतर वाहनांना अडथळा आणल्याच्या सबबीखाली पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या आदेशावरुन क्लॅम्प ठोकण्यात आले. या गुन्ह्यासाठी २00 रु पयांचा दंड भरल्यानंतर महापौरांची मोटार मुक्त करण्यात आली. राजधानी शहरात दुपारी पोलिस महासंचालकांनी स्वत: फेरफटका मारुन बेशिस्त वाहनधारकांना अशा पध्दतीने वढणीवर आणले. यातून सरकारी वाहनेही सुटली नाहीत.
दिवसभरात बेशिस्त पार्क केलेल्या ५0 हून अधिक चारचाकींना क्लॅम्प ठोकून कारवाई करण्यात आल्याचे तसेच नो एंट्रीमधून वाहने हाकणाऱ्यांवरही घाऊक कारवाई केल्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक ब्रॅण्डन डिसोझा यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले. ही कारवाई उद्याही चालूच राहणार आहे.
बेशिस्त पार्किंगमुळे शहरात वाहतुकीची होणारी कोंडी तसेच बेदरकारपणे वाहने हाकण्याचे प्रकार वाढल्याने पोलिस महासंचालक मुक्तेश चंर यांनी वाहतूक पोलिसांना अशा वाहनधारकांवर काडक कारवाईचे निर्देश दिले होते. गुरुवारी दुपारी त्यांनी स्वत: फेरफटका मारुन पाहणी केली असता नेमकी महापौरांची मोटार रस्त्यावर मधोमध पार्क केलेली आणि इतर वाहनांना अडथळा आणत असलेली त्यांना आढळून आली. निरीक्षक ब्रॅण्डन डिसोझा यांना त्यांनी तात्काळ या मोटारीला क्लॅम्प ठोकण्याचे आदेश दिले आणि निरीक्षकांनी त्वरित ही कारवाई केली. क्लॅम्प ठोकण्याआधीच फुर्तादो हे मोटारीतून उतरुन निघून गेले होते त्यामुळे त्यावेळी वाद झाला नाही
नंतर फुर्तादो यांनी या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना आपला चालक मोटारीतच होता त्याने मोटार पार्क केलेली नव्हती तर आपण उतरल्यानंतर मोटार मागे घेऊन तो मनपाच्या जागेत योग्य ठिकाणी ती पार्क करणार होता परंतु त्याआधीच त्याला रोखून क्लॅम्प ठोकण्यात आल्याचे ते म्हणाले. समोर असलेल्या साऊथ इंडियन बँकेच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये हे सर्व रेकॉर्ड झालेले आहे, असा दावा त्यांनी केला. आपला चालकाची जर चूक झालेली असेल तर या कारवाईबाबत आपण डीजीपींना सलाम करतो परंतु त्याचबरोबर डीजीपींनी शहरात इतर ठिकाणी होणाऱ्या डबल पार्किंगवरही कारवाई करावी, असे उपरोधिक आवाहन फुर्तादो यांनी केले आहे त्याचबरोबर शहरात वाहतकीत शिस्त आणण्यासाठी आपणच पार्किंग लागू केले. याचे स्मरणही डीजीपींना करुन दिले आहे.