धारगळ की म्हावळींगे हे एकदा स्पष्टच सांगा? जीसीएच्या वार्षिक सभेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमप्रश्नी १०७ क्लबांचा प्रश्न
By समीर नाईक | Published: October 8, 2023 07:46 PM2023-10-08T19:46:54+5:302023-10-08T19:47:03+5:30
गोवा क्रिकेट संघटनेची (जीसीए) वार्षिक सर्वसाधारण रविवारी पर्वरीत पार पडली.
पणजी : राज्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम लवकरात लवकर व्हावे. त्यासाठी धारगळची जागा योग्य की म्हावळींगेचा प्रस्ताव याचा निर्णय सांगावा असा सवाल गोवा क्रिकेट संघटनेशी संलग्न असलेल्या १०७ क्लबनी केला. राज्यातील अन्य ठिकाणी क्रिकेटसाठी आवश्यक साधनसुविधा उभारण्यावर जीसीएने भर द्यावा, अशी सूचना क्लबनी केली.
गोवा क्रिकेट संघटनेची (जीसीए) वार्षिक सर्वसाधारण रविवारी पर्वरीत पार पडली. १०७ क्लबांच्या प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती. व्यासपीठावर जीसीएचे अध्यक्ष विपुल फडके, सचिव रोहन गावस देसाई आणि खजिनदार दया पागी उपस्थित होते. सभेत मागील सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून तो मंजूर करून घेण्यात आला. दरम्यान, क्लबांनी धारगळ आणि म्हावळींगे येथील क्रिकेट स्टेडियमसंबधी प्रश्न उपस्थित केला. दोन्हीपैकी कोठे जागा निश्चित होणार आणि कधी उभारणी होणार याविषयी जीसीएने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी क्लबनी केली. त्यावर अध्यक्ष विपुल फडके यांनी जेथील प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, तेथेच स्टेडिमय उभारले जाईल, असे सांगितले.
स्टेडियमच्या प्रक्रियेबाबत अहवाल द्यावा
स्टेडियमबाबत जीसीए कुठली प्रक्रिया करत आहे किंवा त्याच्याशी संबधीत संघटनेने कुठला निर्णय घेतला, याची माहिती क्लबना असणे आवश्यक आहे. त्यामुळे निदान महिन्यातून एकदा जीसीएने स्टेडियमबाबतच्या प्रक्रियेची माहिती क्लबना पुरवावी, अशी मागणी प्रतिनिधींनी संघटनेकडे केली.
स्टेडियमसाठी खास आमसभा घ्या
रविवारी झालेल्या आमसभेच्या अजेंडामध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा विषय नव्हता. तरीही सदस्यांनी या विषयावरुन जीसीएसमोर प्रश्न उपस्थित केले. स्टेडियमच्या जागा निश्चितीबाबत राज्यात गोंधळाची स्थिती आहे. धारगळ की म्हावळींगे हे जीसीएने स्पष्ट करावे. फक्त स्टेडीयमबाबत चर्चेसाठी जीसीएने खास आमसभा आयोजित करावी, अशी मागणी क्लबनी केली.
स्टेडियमसाठी धारगळची जागा योग्य - विपुल फडके
जीसीएकडे धारगळ आणि वन म्हावळिंगे येथेे स्वत:ची जागा आहे. त्यामुळे दाेन्ही ठिकाणी क्रिकेटसाठी आवश्यक साधनसुविधा तयार करण्यावर आम्ही भर देणार आहोत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या अनुषंगाने विचार केल्यास धारगळ येथील जागेवर प्रक्रियेला यापूर्वीच सुरुवात करण्यात आली होती. अनेक परवाने आम्हाला या जागेसाठी मिळाले आहेत. त्यामुळे शक्यतो धारगळ येथेच स्टेडियम उभारण्याचा जीसीएचा विचार आहे, असे प्रतिपादन जीसीएचे अध्यक्ष विपुल फडके यांनी केले.
अध्यक्ष फडके म्हणाले की, धारगळ येथे स्पोर्ट्स सिटी व्हावी असे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. त्यांनी असोसिएशनकरिता जमीन उपलब्ध करून दिली. पेडणे मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. येथे विमानतळ आला आहे. चांगला महामार्ग तयार झाला आहे. तसेच मोठमोठी हॉटेल्स येथे आली आहेत. त्यामुळे येथे सहज सुविधा उपलब्ध होतील. बीसीसीआयदेखील या सर्व गोष्टींचा विचार करत संघटनेला सामने देत असते,’ असेही फडके यांनी यावेळी सांगितले.