दाबोळी व डिचोलीतून मगोच लढणार: ढवळीकर
By Admin | Published: November 16, 2016 08:50 PM2016-11-16T20:50:29+5:302016-11-16T20:50:29+5:30
येत्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या प्रस्तावावर मगोने केलेल्या १४ जागांच्या मागणीवर सध्या बोलणी सुरू आहेत. दाबोळी आणि डिचोलीच्या जागांच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही
पणजी: येत्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या प्रस्तावावर मगोने केलेल्या १४ जागांच्या मागणीवर सध्या बोलणी सुरू आहेत. दाबोळी आणि डिचोलीच्या जागांच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे. या जागा मगो पक्षच लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मगो पक्षाने दाबोळी आणि डिचोली मतदारसंघावरील आपल्या दावेदारीचा पुनरोच्चार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघांच्या बाबतीत तडजोड केली जाणार नसल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नवीन इमारतीसाठी शिलान्यास केल्यानंतर आगामी निवडणुकीत मगो भाजप युती संबंधी प्रश्न विचारला असता ते बोलत होते. ते म्हणाले की दाबोळी आणि डिचोली मतदारसंघात मगोचे खूप काम आहे. मागील निवडणुकीत दाबोळी मतदारसंघात अवघ्या काही मतांनी विजयाने हुलकावणी दिली होती. यावेळी तर त्या मतदारसंघात मगोने खूपच काम केलेले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून मगोचाच उमेदवार रिंगणात असेल. या मतदारसंघातील आमदार मॉविन गुदिन्हो हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्यामुळे हा मतदारसंघ मगोला देणे भाजपला परवडेल काय असे विचारले असता ती मॉविनची समस्या असू शकते, मगोची नव्हे असे ते म्हणाले.
डिचोलीतील जागेसाठीचाही आग्रह पक्षाने कायम ठेवला आहे. डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ हे मगोत प्रवेश करणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले असल्यामुळे या जागेवर मगोचा दावा आहे. दाबोळी आणि डिचोली या दोन्ही मतदारसंघावर भाजपनेही दावा केला आहे.
मात्र येत्या निवडणुकीत युती होणार हे मात्र निश्चित आहे. केंद्रात भाजप आघाडीचे सरकार आहे आणि गोव्यासाठी या सरकारने मोठ मोठे प्रकल्प दिलेले आहेत. भाजप - मगो युतीच्या सरकारने गोव्यात विकास केलेला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही युती द्वारेच लढणे हे योग्य ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
ह्यमडकईकरने निर्णय घ्यावाह्ण
कुंभारजुवे मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप आणि मगोत ओढाताण सुरू आहे. या विषयी ढवळीकर यांना विचारले असता आपण याविषयी काही बोलणे बरोबर होणार नाही असे त्यांनी सांगितले. मडकईकर यांनी कोणत्या पक्षात जावे हा निर्णय त्यांनी स्वत: घ्यायचा आहे असे ते म्हणाले. आपण याविषयी केवळ वृत्तपत्रातून वाचत असल्याचे त्यांनी सांगितले.