अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर बदलला? तिघांचा बळी घेणाऱ्या अपघात प्रकरणी मिळाला मोठा पुरावा
By वासुदेव.पागी | Published: August 31, 2023 04:20 PM2023-08-31T16:20:55+5:302023-08-31T16:21:23+5:30
हा अपघात दारुच्या नशेत मर्सीडीस चालविल्यामुळे झाला होता. मर्सीडीस भरधाव होती आणि गाडीत दारुच्या बाटल्याही होत्या.
पणजी : बाणास्तरी येथील महामारर्गावर तिघांचा जीव घेणारा आणि तिघांना गंभीर जखमी करून टाकणारा भयाण अपघात घडल्यानंतर कुणाच्या नजरेत येण्यापूर्वीच चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली आहे. त्यासाठी महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचीही खबर आहे.
हा अपघात दारुच्या नशेत मर्सीडीस चालविल्यामुळे झाला होता. मर्सीडीस भरधाव होती आणि गाडीत दारुच्या बाटल्याही होत्या. ६ गाड्यांना ठोकर देऊन मर्सीडीसने पुलाच्या कठड्याला ठोकर दिली. त्यावेळी त्या ठिकाणी लोक जमण्यापूर्वीच चालक बदलण्याचे प्रकार घडल्याचे सांगणारे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार मिळाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण वेगळेच वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या अपघाताला जबाबदार म्हणून परेश सिनाय सावर्डेकर याला अटक करण्यात आली होती. परंतु मर्सीडीस चालक ही परेशची पत्नी मेघना सिनाय सावर्डेकर असल्याचा दावा करून तिला अटक करण्याची मागणी लोकांनी केली होती. त्यासाठी म्हार्दोळ पोलीस स्थानकावरही मोर्चा नेला होता. परंतु मर्सीडीस परेशच चालवित होता या आपल्या दाव्यावर म्हार्दोळ पोलीस ठाम राहिले होते.
त्यानंतर हे प्रकरण क्राईम ब्रँचला सोपविल्यानंतर क्राईम ब्रँचने वेगळ्या पद्धतीने तपासाचा धडाका लावताना काही महत्तवाचे साक्षीदार मिळविले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमयरित्या वळण मिळण्याचे संकेत आहेत. प्रसंगी एफआयआरमध्येही बदल करावा लागणार अशी चर्चा आहे. दरम्यान चालक बदलण्यात सहभागाच्या कारणावरून आम आदमी पार्टीचे प्रमुख ॲडव्होकेट अमित पालेकर यांना क्राईम ब्रँचने अटक केली आहे.