दोन महिन्यांपूर्वी मृत्यू... अंत्यसंस्कारही झाले अन् तीच व्यक्ती आली घरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 08:12 AM2024-01-04T08:12:16+5:302024-01-04T08:12:48+5:30
कथित मृत झाला कसा जिवंत? आगशी पोलिसांकडून तपास सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीवर कुटुंबीयांनी रीतसर अंत्यसंस्कार केले. मात्र, तीच व्यक्ती थेट सुखरूपरीत्या घरी येऊन कुटुंबीयांसमोर उभी राहिली अशी घटना आगशी येथे काल घडली व खळबळ उडाली. या प्रकाराची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच काहीसा हा प्रकार घडला असून, याबाबत आगशीचे पोलिस तपास करू लागले आहेत.
अलीकडेच आगशी येथील मिलाग्रेस गोन्साल्विस (वय ५९) नामक व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, तीच व्यक्ती आता जिवंत घरी परतल्याने चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी पणजी पोलिसांना एक मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंद केले होते, पण तपासाअंती पोलिसांनी मृत व्यक्ती आगशी येवील मिलाग्रेस असल्याचा निष्कर्ष काढून कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर मिलाग्रेसच्या नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला होता. नंतर कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक दोन महिन्यांनंतर मिलाग्रेस घरी परतला तेव्हा सर्वांना धक्का बसला. या घटनेमागची सत्य माहिती पुढे येणार आहे. तो कोठे होता, याचा अधिक तपशील अद्याप आलेला नाही. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आता पोलिसांकडून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला पोस्टमार्टम रिपोर्टवर नाव बदलण्याची विनंती करण्यात आली आहे.
आजारपणामुळे सोडले होते घर
मिलाप्रेस गोन्साल्विस हा आजारपणाने चिंताग्रस्त होता, तो अचानक गायब झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली होती, पोलिसांना पणजीत एक मृतदेह मिळाला होता. तो मिलाग्रेस यांच्या कुटुंबीयांना दाखविण्यात आला होता. त्या मृतदेहाचे मिलाप्रेस याच्याशी साधर्म्य असल्याचे निदर्शनास आल्याने तो मिलाग्रेस असल्याचे समजून मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.
'तो' मृतदेह कोणाचा?
दोन महिन्यांनी मिलाग्रेस पुन्हा आला आहे. त्यामुळे सर्वत्र तर्कवितर्क लावले जात असताना कुटुंबीयांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, तो कोणाचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिस पुन्हा कामाला लागले असून, चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती आगशीचे माजी सरपंच झेवियर ग्रासियस यांनी दिली.