म्हादई बचाव अभियानमध्ये मतभेद; नंदकुमार कामत यांचा सदस्यपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:11 PM2019-11-01T13:11:38+5:302019-11-01T13:11:46+5:30
राज्याचे पाणी धोरण दीर्घकाळ प्रलंबित आहे.
पणजी : म्हादई नदीचे पाणी कर्नाटककडून वळविण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या म्हादई बचाव अभियानमध्ये मतभेद निर्माण झाले असून गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक, शास्रज्ञ नंदकुमार कामत यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
अभियानच्या अध्यक्ष निर्मला सावंत व सचिव राजेंद्र केरकर यांना पत्र पाठवून म्हादईच्या प्रश्नावर अभियानने राज्य तसेच केंद्र सरकारशी जे व्यवहार आरंभले आहेत त्याला कामत जोरदार आक्षेप घेतला आहे. राज्याचे पाणी धोरण दीर्घकाळ प्रलंबित आहे. त्याबद्दल सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यास अभियान अपयशी ठरले असल्याचा आरोप कामत यांनी केला आहे.
कामत म्हणतात की,‘ जागतिक, राष्ट्रीय किंवा स्थानिक जल व्यवस्थापन या विषयात आपला अभ्यास आहे आणि या विषयात अनेक शिफारशीही वेळोवेळी केलेल्या आहेत. म्हादईचे पाणी वळविण्याच्या बाबतीत कोणत्यााही वाटाघाटी चालणार नाहीत. राज्यात कागदोपत्री ८५२0 एमसीएम शुध्द पाणी उपलब्ध असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात ते केवळ १७६१ एमसीएम एवढेच आहे.’
समुद्रातील पाण्याची पातळी वाढत असताना पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेबाबत सरकारने गंभीरपणे पावले उचलली पाहिजेत मात्र तसे होताना दिसत नाहीत. गोव्यातील राजकारण्यांची येथील पर्यावरण, पाणी, वीज, अन्न सुरक्षा याबाबत नियोजनाच्या बाबतीत निराशाजनक कामगिरी आहे आणि त्याबद्दल अभियानच्या पदाधिकाºयांना मी वेळोवेळी इशारा देऊनही कोणताच पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे अभियानपासून विभक्त होऊन यापुढे गोमंतकीय जनतेसाठी स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.