गोव्यात मगोपचे तीन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये भिन्न धोरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:18 PM2019-04-16T13:18:07+5:302019-04-16T13:18:21+5:30
राज्यातील सर्वात जुन्या प्रादेशिक पक्षाचे नेते एकाकी पडले आहेत.
पणजी : गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने विधानसभा पोटनिवडणुकीत तीन मतदारसंघांमध्ये तीन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. राज्यातील निवडणुकीच्या इतिहासात मगोपकडून प्रथमच ही गोष्ट घडत आहे.
पक्षाच्या दोन आमदारांनी बंड करून विधिमंडळ पक्षाच भाजपात विलीन केल्यानंतर राज्यात मगोप नेते एकाकी पडले आहेत. सुदिन ढवळीकर यांचे उपमुख्यमंत्रीपद गेले त्यामुळे त्यांनीही भाजपला या निवडणुकीत धडा शिकवणे हे एकमेव धोरण अवलंबिले आहे. शिरोडा मतदारसंघ खुद्द मगोपचे अध्यक्ष तथा दीपक ढवळीकर हे निवडणूक लढवीत आहेत. दीपक हे सुदिन ढवळीकर यांचे बंधू आहेत. म्हापसा मतदारसंघात मगोपने काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांना पाठिंबा दिला आहे, तर मांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांना समर्थन दिले आहे. राज्यातील सर्वात जुन्या असलेल्या या प्रादेशिक पक्षाच्या तीन वेगवेगळ्या भूमिकांमुळे राजकीय विश्लेषकही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
सत्तेपासून दूर असलेल्या ढवळीकर बंधूंनी आता भाजपला या निवडणुकीत धडा शिकवणे हेच उद्दिष्ट ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यात काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना तर दक्षिण गोव्यात काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
गोव्यात येत्या २३ रोजी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी तसेच लोकसभेसाठी मतदान होणार आहे.
दरम्यान, राज्यातील भाजपप्रणीत सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा याबाबत पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे सूत्रांनी सांगितले. अंमलबजावणीसाठी राज्यपालांना व सभापतींना पत्र द्यावे लागते. मगोपचे कार्यकर्ते उत्तर व दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारांसाठी काम करत आहेत.