डीआयजी अधिकाऱ्याचे पबमधील महिलेशी गैरवर्तन, महिलेने कानशिलात लगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:17 PM2023-08-14T12:17:41+5:302023-08-14T12:18:52+5:30
तात्काळ डीजीपी यांच्याकडे अहवाल द्यावा, असे या आदेशात म्हटले आहे.
गोव्याचे डीआयजी डॉ. ए. कोन यांनी पबमध्ये एका महिलेशी अश्लील वर्तन केले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर, त्यांना डीआयजी पदावरुनही हटविण्यात आले आहे. गोव्याचे अंडर सेक्रेटरी पर्सनल २ यांच्याकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. डॉ. ए. कोन यांना डीआयजी पदावरुन हटविण्यात येत आहे. त्यांनी तात्काळ डीजीपी यांच्याकडे अहवाल द्यावा, असे या आदेशात म्हटले आहे.
गोव्यातील बागा-कलेंगुट बीचवरील एका नाईटक्लब पबमध्ये ही घटना घडली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत येथे डीआयजी, आयपीएस अधिकारी डॉ. के. कोन आले होते. त्यांनी दारु प्यायली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. यावेळी, त्यांची एका महिलेसोबत बाचाबाची झाली. त्यावेळी, महिलेने डीआयजींना कानशिलात लगावली. त्यानंतर, क्लबमध्ये गोंधळ झाला. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी मेडीकल रजेवर होते, अशी माहिती आता समोर येत आहे.
संबंधित क्लब हा गोव्यातील एका राजकीय नेत्याचा असून विधानसभा अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे, विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावेळी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध योग्य ती कडक कारवाई करण्याचे आश्वास सभागृहात दिले आहे.
दरम्यान, गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत या मुद्द्यावर भाष्य केले. तसेच, संबंधित अधिकाऱ्यावर कडक शासन करावे, अशी मागणीही केली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. त्यामुळे, पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. मात्र, सरदेसाई यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे.