वादामुळे अडले दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, रमेश तवडकरांचे मंत्रिपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2024 10:12 AM2024-10-04T10:12:13+5:302024-10-04T10:12:55+5:30
आता महाराष्ट्र निवडणूक निकालानंतरच गोव्यात बदल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपमधील अंतर्गत वाद, दोन मंत्र्यांचा संघर्ष आणि अन्य तत्सम कारणांमुळे गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना अडली आहे. आता महाराष्ट्र, हरयाना आदी राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतरच गोव्यात काही राजकीय बदल होतील, अशी माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यात मध्यंतरी जो संघर्ष झाला, त्यानंतर दिल्लीत केंद्रीय नेत्यांनी बैठक घेतली. मंत्रिमंडळाची फेररचना करायची झाली तर आपल्यालाही विश्वासात घेतले जावे, असा मुद्दा मंत्री राणे यांनी मांडला होता, तो केंद्रीय नेत्यांनी अगोदरच मान्य केला आहे. महाराष्ट्र व हरयाना निवडणूक निकाल लागेपर्यंत गोव्यात कोणताही बदल होणार नाहीत, याची कल्पना दिल्लीतील बैठकीनंतर गोव्यातील सर्व मंत्र्यांना आली आहे.
आमदार दिगंबर कामत, रमेश तवडकर, संकल्प आमोणकर, नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळात घेण्याचा भाजपच्या श्रेष्ठींचा विचार आहे. चतुर्थीनंतर मंत्रिमंडळ फेररचना होईल, असे विधान मध्यंतरी मुख्यमंत्री सावंत यांनी केले होते, पण कामत किंवा संकल्प यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी आता स्थिती अनुकूल नाही, असे गोव्यातील काही मंत्र्यांनी दिल्लीस कळविले आहे.
त्यांचे पद शाबूत...
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मंत्रिपदासाठी डिलायला लोचो यांचे नाव सुचविले होते. तेही मान्य आलेले नाही. मंत्रिमंडळ फेररचना करण्यापूर्वी रोहन खंवटे यांना देखील विश्वासात घेतले जाणार आहे. कारण पर्यटन मंत्री खंवटे हे सध्या बार्देशमध्ये भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. नीळकंठ हळर्णकर किवा गोविंद गावडे यांचे मंत्रिपद काढून घेऊन ते अन्य काही नेत्यांना दिले जाईल ही चर्चा आता संपुष्टात येऊ लागली आहे.
भाजप कोअर टीमची बैठक
दरम्यान, गोवा भाजपच्या कोअर टीमची महत्त्वाची एक बैठक आज, शुक्रवारी होत आहे. सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या बैठकीवेळी गोव्यातील सध्याची राजकीय स्थिती, काही धार्मिक गटांकडून तयार केले जाणारे वातावरण तसेच भाजपची सदस्य नोंदणी मोहीम यावर चर्चा होईल.