दिगंबर कामत यांना दिल्लीत बोलावून दिले होते तिकीट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2024 01:54 PM2024-03-07T13:54:23+5:302024-03-07T13:54:31+5:30
कामत यांनी आपले आरोग्य व अन्य विषय पुढे करून तिकीट नाकारले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिलांनाच तिकीट द्यावे, असा निर्णय भाजप श्रेष्ठींना घ्यावा लागला. कारण दिगंबर कामत यांनी आपल्याला तिकीट नको, अशी भूमिका घेतली. कामत यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिल्लीत बोलावून घेऊन खासदारकीचे तिकीट स्वीकारण्याची विनंती केली होती. पण, कामत यांनी आपले आरोग्य व अन्य विषय पुढे करून तिकीट नाकारले.
कामत यांच्याएवढा प्रबळ उमेदवार नसल्याने भाजपच्या श्रेष्ठींना शेवटी आपला विचार बदलावा लागला. महिला उमेदवार घेऊन या, असा आदेश गोवा भाजपला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिला आहे. कामत हे माजी मुख्यमंत्री असून, ते ज्येष्ठही आहेत. त्यांना गोवा मंत्रीमंडळात भविष्यात घेतले जाईल की नाही ते आता सांगता येत नाही. मात्र, त्यांना दिल्लीच्या राजकारणात न्यावे, असे ठरले होते.
गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील कामत यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. दक्षिण गोव्यातून तिकीट स्वीकारावे, असे सुचविले होते. पण, आपण आता गोवा सोडू शकणार नाही, असे कामत यांनी सांगितले. त्यामुळे कामत यांच्याऐवजी भाजपने दुसऱ्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित केले आहे.
म्हणून शोधाशोध...
दिगंबर कामत यांनी नकार दिल्यानंतर पक्षाने दिलेले दुसरे इच्छुक उमेदवार केंद्रीय नेतृत्वाला पसंत पडलेले नाहीत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही सर्व्हे करून पाहिले आहेत. महिला उमेदवार कोण असेल याचा अंदाज मात्र सध्या कुणाला येत नाही. उमेदवार म्हणून कोणत्याच मंत्री किंवा आमदाराची पत्नी शक्यतो नकोच, असे केंद्रीय नेत्यांनीही गोवा भाजपला सांगितले आहे.