खाण घोटाळा : दिगंबर कामत यांच्या मुलालाही एसआयटीचे बोलावणे, कामत गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 08:18 PM2017-11-21T20:18:16+5:302017-11-21T20:49:50+5:30
काही खनिज खाणींना 'कन्डोनेशन ऑफ डिले'चा लाभ दिल्याबाबत तसेच प्रफुल्ल हेदे यांच्या कुळे येथील खनिज लीजचे बेकायदा पद्धतीने नूतनीकरण करून दिल्याबाबत पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी काम करत असून या कामाचा भाग म्हणून एसआयटीने प्रथमच दिगंबर कामत यांचे पुत्र योगिराज कामत यांना उद्या बुधवारी सायंकाळी हजर राहण्यास सांगितले आहे.
पणजी : काही खनिज खाणींना 'कन्डोनेशन ऑफ डिले'चा लाभ दिल्याबाबत तसेच प्रफुल्ल हेदे यांच्या कुळे येथील खनिज लीजचे बेकायदा पद्धतीने नूतनीकरण करून दिल्याबाबत पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी काम करत असून या कामाचा भाग म्हणून एसआयटीने प्रथमच दिगंबर कामत यांचे पुत्र योगिराज कामत यांना उद्या बुधवारी सायंकाळी हजर राहण्यास सांगितले आहे. स्वत: कामत हे आज मंगळवारी एसआयटीसमोर येऊ शकले नाहीत. त्यांना शुक्रवारी हजर राहण्यास एसआयटीने सांगितले आहे.
कामत यांना विशेष न्यायालयाकडून सोमवारी अंतरिम दिलासा मिळाला. त्यामुळे एसआयटी आता त्यांना प्रफुल्ल हेदे खाण प्रकरणी अटक करू शकत नाही. अंतरिम दिलासा मिळण्यापूर्वी एसआयटीने कामत यांना अटक करण्यासाठी सगळी तयारी केली होती. कामत यांचा शोध शनिवारी दिवसभर घेतल्यानंतर रविवारीही शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. कामत हे मंगळवारी एसआयटीसमोर चौकशीसाठी येतील, असे पोलिसांना वाटले होते. तथापि, आपण थोडे आजारी असल्याने केवळ आरोग्याच्या कारणास्तव मंगळवारी हजर होऊ शकणार नाही असे कामत यांनी एसआयटीला एका पत्राद्वारे कळवले. त्यामुळे एसआयटीने विचार केला व कामत यांना येत्या शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले आहे. कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी येत्या 27 रोजी विशेष न्यायालयासमोर होणार आहे. कामत यांची यापूर्वी ईडीनेही चौकशी केली आहे. कामत हे शुक्रवारी एसआयटीसमोर येतील अशी माहिती कामत यांच्या नजिकच्या सुत्रांनी दिली.
कामत यांचे पुत्र योगिराज हे आज एसआयटीसमोर येणार की नाही ते कळू शकले नाही. तथापि, त्यांना समन्स पाठविले गेले आहे. यापूर्वी कधीच त्यांना एसआयटीसमोर यावे लागले नव्हते. खनिज व्यवसायिक प्रफुल्ल हेदे हे मुंबईत आहेत. त्यांना एसआयटीने समन्स काढले आहे पण ते समन्स पाठवून दिले गेलेले नाही. कारण हेदे हेही आजारी असून उपचारासाठी मुंबईत असल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. ते व्यवस्थित होऊन गोव्यात पोहचल्यानंतरच त्यांना समन्स दिले जाणार आहे, असे एका अधिका-याने सांगितले.
दरम्यान, कन्डोनेशन ऑफ डिले प्रकरणी माजी खाण सचिव राजीव यदुवंशी यांनी न्यायालयासमोर पोलिसांना कामत यांच्याविरोधात जबानी दिल्यामुळे एकूण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. कामत यांच्या एका माजी ओएसडीलाही पोलिस समन्स पाठवणार आहेत. यदुवंशी यांनी त्या ओएसडीचेही नाव जबानीवेळी पोलिसांना दिले आहे.