टॅक्सी व्यावसायिकांना डिजिटल मीटर मोफत; सरकारकडून चतुर्थीची भेट, ३४ कोटींचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 09:50 PM2021-09-08T21:50:02+5:302021-09-08T21:50:19+5:30
गोवा माइल्सच्या टॅक्सींनाही हे मीटर बसवावे लागतील. सर्व टॅक्सीचालकांकडे १५ वर्षे गोव्यात निवासाचा दाखला व बॅच असणे सक्तीचे आहे.
पणजी : टॅक्सी व्यावसायिकांना सरकारने चतुर्थीची भेट म्हणून डिजिटल मीटर मोफत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ३४ कोटी रुपयांचे डिजिटल मीटर सरकार सुमारे २० हजार टॅक्सी व्यावसायिकांना मोफत देणार आहे. या खर्चासाठी अर्थसंकल्पीय तरतूदही केली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मीटरसाठी ११ हजार रुपये मोजावे लागत असत. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, गोवा माइल्सच्या टॅक्सींनाही हे मीटर बसवावे लागतील. सर्व टॅक्सीचालकांकडे १५ वर्षे गोव्यात निवासाचा दाखला व बॅच असणे सक्तीचे आहे.
दरम्यान, मंत्री मायकल लोबो यांनी असा इशारा दिला आहे की, ॲपधारित टॅक्सीसेवा देणाऱ्यांना टॅक्सी स्टॅंड, किनारे किंवा हॉटेलांच्या ठिकाणी ग्राहक घेता येणार नाहीत. रांगेत राहूनच त्यानी व्यवसाय करावा. ’
ताम्हणकरांचा आरोप
टॅक्सी व्यावसायिकांसाठी लढा देणारे खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी मीटर मोफत देण्याची घोषणा म्हणजे कमिशन खाण्याचा व निवडणूक निधी उभारण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. ताम्हणकर म्हणाले की, आम्ही हायकोर्टात गेलो होतो ते ॲपधारित मीटर मिळावेत म्हणून. आम्हाला ॲपधारित मीटरचा पर्याय हवा होता. सरकार ३४ कोटींचा घोटाळा करू पहात आहे.’