देश-विदेशातून गोव्यात थेट विमानसेवा सुरु करावी; केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सिंधीया यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 09:36 AM2023-08-26T09:36:45+5:302023-08-26T09:37:20+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची भेट घेऊन केली.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी देश, विदेशातील विविध ठिकाणांहून गोव्यात थेट विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची भेट घेऊन केली.
शिष्टमंडळात वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांचा समावेश होता. मोपा येथे मनोहर इंटरनॅशनल विमानतळ सुरु झाल्याने थेट विमाने सुरु करण्यास भरपूर वाव आहे. दाबोळी विमानतळासारखे वेळेचे निर्बंध नाहीत. दाबोळी नौदलाच्या ताब्यात असल्याने नागरी उड्डाणांसाठी वेळेच्या मर्यादा आहेत. मोपावर कोणत्याही मर्यादा नाहीत. देश विदेशातून पर्यटकांना गोव्यात येता यावे यासाठी काही ठिकाणांहून थेट विमानसेवा सुरु करणे गरजेचे आहे याकडे लक्ष वेधले.
थेट विमानसेवा सुरु झाल्यास देश विदेशातून पर्यटकांची नवी बाजारपेठ गोव्याला मिळेल, असा मुद्दा मांडण्यात आला. हवाई वाहतूकमंत्री सिंधीया यांनी यात सहानुभूतीपूर्वक लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.