पोलीस महासंचालकांची कळंगुट स्थानकाला भेट
By काशिराम म्हांबरे | Published: July 18, 2024 02:42 PM2024-07-18T14:42:12+5:302024-07-18T14:42:22+5:30
अलोक कुमार यांनी आज कळंगुट पोलीस स्थानकाला भेट देऊन पोलिसांचे अभिनंदन केले.
म्हापसा: काशिराम म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क
ओर्डा कांदोळी येथील खून प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसात छडा लावून खून्याला अटक करण्यास यश प्राप्त केल्याबद्दल गोवा पोलीस सेवेत नव्याने नियुक्त करण्यात आलेले पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी आज कळंगुट पोलीस स्थानकाला भेट देऊन पोलिसांचे अभिनंदन केले.
नियुक्तीनंतर महासंचालकांनी एखाद्या स्थानकाला दिलेली ही पहिलीच भेट होती. राज्यातील प्रमुख पोलीस स्थानकांना भेट देण्यास आपण प्रादान्य देणार असल्याचे महासंचालकांनी नियुक्तीनंतर सांगितले होते. यावेळी त्यांच्या सोबत उत्तर गोव्याचे अधिक्षक अक्षर कौशल, उपअधिक्षक विश्वेश कर्पे निरीक्षक, निरीक्षक परेश नाईक उपस्थित होते.
खून प्रकरणात कळंगुटातील पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने तपास केल्याने ते अभिनंदनास पात्र ठरत असल्याचे अलोक कुमार यावेळी म्हणाले. तसेच पोलीस स्थानकाच्या हद्दीतील इतर मुद्दे, वाहतुकीचे प्रश्न सारख्या मुद्यांवर आपण चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
महासंचालकांनी अनेक सुचना मांडल्या. तसेच खून प्रकरणात कशा प्रकारे जलद गतीने आरोपपत्र दाखल करता येईल याची माहिती दिली. कळंगुट पोलीस स्थानकावरील समस्या तसेच स्थानकासंबंधी इतरही मुद्यांवर विस्तारीत चर्चा केल्याची माहिती कौशल यांनी दिली. या संबंधीचा विस्तारीत अहवाल तयार करून सादर केला जाणार असल्याचे ते म्हणाले.