मतभेद मिटले, प्रसंगी कारवाई - दिपक ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:18 PM2019-03-23T12:18:17+5:302019-03-23T12:24:11+5:30
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन आमदारांमध्ये जे मतभेद होते, ते सामोपचाराने मिटविले गेले आहेत असा दावा मगो पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री दिपक ढवळीकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी केला.
पणजी - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगोप) तीन आमदारांमध्ये जे मतभेद होते, ते सामोपचाराने मिटविले गेले आहेत असा दावा मगो पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री दिपक ढवळीकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी केला. जर पक्षातील कुणी सभापतींना किंवा राजभवनला वगैरे परस्पर कसले पत्र दिलेले असेल तर पक्षाच्या घटनेनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे ढवळीकर म्हणाले.
ढवळीकर म्हणाले, की तिन्ही आमदारांमध्ये थोडा गैरसमज निर्माण झाला होता. आपण अध्यक्ष या नात्याने आमदारांची बैठक घेतली व गैरसमज दूर करत मतभेद मिटविले आहेत. काहीजण उगाच आमच्या पक्षात गैरसमज निर्माण करू पाहत आहेत. आमदारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करू पाहत आहेत. प्रत्यक्षात आमचे आमदार संघटीत आहेत. मगो पक्षाच्या संघटनेचाही आमदारांशी सुसंवाद आहे. बैठकांनाही आमदार उपस्थित असतात.
ढवळीकर म्हणाले, की बाबू आजगावकर हे मगो पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आहेत. आजगावकर यांच्याविरोधात मगो पक्षाने कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. उगाच तशा अफवा विरोधक पसरवत आहेत. अशा प्रकारच्या चर्चेला बळ पुरविणाऱ्या घटकांचा मी निषेध करतो. मुळात आजगावकर यांच्याविरोधात पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. तसे काही घडलेले नाही. जे थोडेफार मतभेद आमदारांमध्ये होते ते अगोदरच दूर झालेले आहेत.
ढवळीकर म्हणाले, की आजगावकर व दिपक पाऊसकर हे आमदार पूर्णपणे पक्षासोबत आहेत. ते पक्ष सोडून जाण्याचा प्रश्न येत नाही. मी स्वत: शिरोडा मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहे. आम्ही गोव्यात भाजपाप्रणीत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पूर्ण सहकार्य केले आहे. यापुढे लोकसभा निवडणुकीवेळीही आम्ही भाजपाला सहकार्य करणार आहोत. शिरोडा मतदारसंघातून मी उमेदवारी मागे घ्यावी असे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी मला कधी सांगितलेही नाही.