भगवानपरशुरामाविषयी अपशब्द वापरल्यामुळे गोव्यात असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:41 AM2020-03-02T04:41:24+5:302020-03-02T04:41:33+5:30
नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बाणावली (दक्षिण गोवा) येथे झालेल्या सभेत एक निदर्शक रामकृष्ण जल्मी यांनी भगवानपरशुरामाविषयी अपशब्द वापरल्यामुळे सध्या वादंग माजले आहे.
पणजी-फोंडा-मडगाव-वास्को : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बाणावली (दक्षिण गोवा) येथे झालेल्या सभेत एक निदर्शक रामकृष्ण जल्मी यांनी भगवानपरशुरामाविषयी अपशब्द वापरल्यामुळे सध्या वादंग माजले आहे. याबाबत विविध ठिकाणांहून अनेक धार्मिक संस्थांनी पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंद केलेल्या आहेत. त्यांच्या आधारे गोवा पोलिसांनी जल्मी यांना रात्री अटक केली आहे. दरम्यान, सीएएविरोधी आंदोलकांनी जल्मी यांचे वादग्रस्त विधान हे त्यांचे वैयक्तिक विचार असल्याचे म्हटले आहे. आंदोलनाशी त्यांचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सभेत त्यांनी परशुरामाविषयी वादग्रस्त विधाने करताना अनेक अपशब्दही वापरल्याचा आरोप संस्थांनी केला आहे. त्यांच्या भाषणाची ध्वनिचलचित्रफित (व्हिडीओ) समाजमाध्यमात प्रसारित झाली आहे. त्यामुळे या घटनेची दखल घेत अनेकांनी पणजी पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदविली आहे.
बाणावलीत दांडो मैदानावर २९ फेब्रुवारीला ‘पीपल्स फोरम फॉर जस्टीस, सेक्युलरिझम आणि डेमॉक्रसी’ यांनी सभा भरविली होती. जल्मी यांच्याविरुध्द कोलवा पोलीस ठाण्यात गौरांग प्रभू मळकर्णेकर यांनी तक्रार नोंदविली आहे.