थकबाकीदारांचा वीजपुरवठा बंद करा; अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 02:38 PM2023-03-01T14:38:52+5:302023-03-01T14:39:30+5:30
३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : थकीत बिले भरण्यासाठी वीज खात्याने एक रकमी फेड योजनेचा (ओटीएस) कालावधी आणखी महिनाभराने वाढवला आहे. ३१ मार्चपर्यंत बिलांची रक्कम न भरणाऱ्यांची तसेच ज्यांची बिले तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ थकलेली आहेत, अशा ग्राहकांचीही वीज तोडण्यात येणार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
थकबाकीदार ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यास टाळाटाळ केल्यास कनिष्ठ अभियंता व साहाय्यक अभियंता यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा ढवळीकर यांनी दिला आहे. ओटीएसची महिनाभराची मुदत काल संपली. अजूनही अनेकजण थकीत बिले भरणे बाकी आहेत. त्यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ढवळीकर म्हणाले की, १२ महिन्यांच्या कालावधीत हप्त्याहप्त्यांनी थकीत रक्कम भरण्याचा पर्याय अनेकांनी निवडला. त्यामुळे खात्याचे काही नुकसान झालेले नाही. उर्वरित कालावधीचा २ टक्के दंड तेवढा माफ झाला. परंतु ज्यांनी या योजनेचा फायदा घेऊन एकाचवेळेला थकीत बिलाची सर्व रक्कम भरली त्यांच्याबाबतीत मात्र डीपीसी वजा झाल्याने नकसान झाले खात्याला थोडेफार नुकसान झाले.
वीज तोडल्याशिवाय लोक पैसे भरणार नाहीत
काही जण मुद्दामहून बिले न भरता थकबाकी ठेवतात. काहीजणांची बिले परिस्थितीमुळे थकलेली चुकून आहे. तर काहीजणांकडे चुकून थकबाकी राहिली खात्याने आता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ बाकी असलेल्या थकबाकी ग्राहकांची वीज तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. वीज तोडल्याशिवाय कोणी बिले भरण्यास पुढे येणार नाहीत. पुढील महिनाभरात सर्व काही स्ट्रीमलाइन हो आणि जे थकबाकीदार आहेत त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई सुरू होईल, असा इशाराही ढवळीकरांनी दिला
४०० कोटींचे टार्गेट
२०२० साली नीलेश काब्राल वीजमंत्री असताना ओटीएस सुरु करण्यात आली. मात्र सुरुवातीला या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दहा टक्केही ग्राहक फिरकले नाहीत. सुमारे १ लाख ४० हजार ग्राहकांकडे बिलांची थकबाकी होती. प्रतिसाद न मिळाल्याने त्यानंतर दोन ते तीन वेळा ओटीएस पुन्हा खुली करण्यात आली. ४०० कोटी रुपये थकबाकी वसूल करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अद्याप त्यातील निम्मीही थकबाकी वसूल झालेली नाही.
ग्राहकांच्या तक्रारी
दरम्यान, ग्राहकांच्याही काही तक्रारी आहेत. मध्यंतरी भरमसाट रकमेची वीज बिले दिली गेल्याने अनेकांनी ती भरली नाहीत आणि त्यामुळे थकबाकी राहिली. ओटीएसच्या नावाखाली खात्याचे कर्मचारी ग्राहकांचा छळ करतात, अशा तक्रारीही अधून मधून येत असतात. काही ग्राहकांचे असे म्हणणे आहे की, सर्व थकबाकी भरली तरी नंतर ती पुन्हा बिलामध्ये दाखवण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"