आठवीपर्यंत उत्तीर्ण धोरणाच्या फेरआढाव्यासाठी आज चर्चा
By admin | Published: August 24, 2015 02:02 AM2015-08-24T02:02:52+5:302015-08-24T02:03:04+5:30
पणजी : आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची पध्दत पुढे चालू ठेवावी की बंद करावी याबाबत निर्णयासाठी शिक्षण खात्याने बोलावलेली शिक्षक संघटना आणि
पणजी : आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची पध्दत पुढे चालू ठेवावी की बंद करावी याबाबत निर्णयासाठी शिक्षण खात्याने बोलावलेली शिक्षक संघटना आणि संबंधित घटकांची बैठक सोमवारी (दि.२४) होणार आहे.
खात्याचे संचालक गजानन भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सर्व राज्यांना धोरण ठरविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे, त्या अनुषंगाने ही बैठक होत आहे.
बहुतांश पालकांची पूर्वीप्रमाणे परीक्षा घेतल्या जाव्यात, अशीच मागणी आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इयत्ता आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची तरतूद आहे. पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नाही. ही पध्दत बदलण्याची मागणी गोव्यासह अन्य काही राज्यांनी केंद्रीय सल्लागार मंडळाच्या बैठकीत केलेली आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून गोव्याला ही पध्दत बदलण्यास मुभा द्यावी, अशी विनंती याआधी केलेली आहे.
१ एप्रिल २0१0 रोजी शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला. या कायद्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना केवळ श्रेणी देण्याची तरतूद आहे. यामुळे आठवीपर्यंत मुले सहज उत्तीर्ण होतात आणि नंतर नववी, दहावीत गटांगळ्या खातात.
(प्रतिनिधी)