मोदी सरकारकडून अपेक्षाभंग
By admin | Published: May 27, 2016 02:49 AM2016-05-27T02:49:46+5:302016-05-27T02:54:25+5:30
पणजी : केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा घोर अपेक्षाभंग केला आहे. देशात पेट्रोलचे दरही कमी झाले नाही, महागाईही नियंत्रणात आली
पणजी : केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा घोर अपेक्षाभंग केला आहे. देशात पेट्रोलचे दरही कमी झाले नाही, महागाईही नियंत्रणात आली नाही व विदेशातील काळा पैसाही परत आणून तो सरकारने लोकांच्या बँक खात्यात जमा केला नाही, असे अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्र्वेदी म्हणाल्या.
प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषदेत बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या की, महागाई खूपच वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आत्महत्या केल्या. मात्र, त्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवली नाही. कोणतीच उपाययोजना केली नाही. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा आधार होता; पण या योजनेसाठी जो निधी द्यावा लागतो तो देखील मोदी सरकारने दिला नाही. तो द्यावा अशी आठवण सर्वोच्च न्यायालयाने सरकारला करून द्यावी लागली.
चतुर्र्वेदी म्हणाल्या की, अलीकडे काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांवेळी जरी भाजपला यश मिळाले तरी, भाजपची मतांची टक्केवारी घटली आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आता भाजपच्या मतांचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे विधानसभा निवडणूक निकाल दाखवून देतो. आसाममध्ये पंधरा वर्षे काँग्रेसचे सरकार होते, कुठचेच सरकार सहसा सलग चौथ्यांदा निवडून येत नसते. एका वर्षांत दोन कोटी रोजगार संधी निर्माण करू, अशी ग्वाही २०१४ सालच्या निवडणुकीवेळी भाजपने दिली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत केवळ १ लाख ३ हजार एवढ्याच रोजगार संधी निर्माण झाल्या.
चतुर्र्वेदी म्हणाल्या की, गोव्यातील लोकही राज्य सरकारच्या अपयशाबाबत खूप बोलत असल्याचे ऐकायला येते.
(प्रतिनिधी)