सत्ताधारी भाजपामध्ये पुतळाप्रश्नी दोन गट, पक्ष भूमिकेशी ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 10:58 AM2018-01-18T10:58:01+5:302018-01-18T11:00:47+5:30

पन्नास वर्षानंतर आता स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेसमोर उभा करण्याची काहीच गरज नाही, अशी भूमिका भाजपाच्या पक्ष संघटनेने घेतली आहे.

Dispute In Goa BJP Over Statue | सत्ताधारी भाजपामध्ये पुतळाप्रश्नी दोन गट, पक्ष भूमिकेशी ठाम

सत्ताधारी भाजपामध्ये पुतळाप्रश्नी दोन गट, पक्ष भूमिकेशी ठाम

googlenewsNext

पणजी : पन्नास वर्षानंतर आता स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेसमोर उभा करण्याची काहीच गरज नाही, अशी भूमिका भाजपाच्या पक्ष संघटनेने घेतली आहे. पक्ष संघटनेने आपल्या आमदारांनाही त्याविषयी कल्पना दिली आहे. मात्र भाजपाच्या आमदारांमध्ये याबाबत दोन गट आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (19 जानेवारी) किंवा त्यानंतर भाजपाच्या सर्व आमदारांची पक्षाकडून बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली. 

स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा एकट्याचाच पुतळा गोवा विधानसभा प्रकल्पासमोर आहे. बांदोडकर व जॅक सिक्वेरा यांची तुलना होऊ शकत नाही असे भाजपाच्या कोअर टीमच्या काही सदस्यांनी आपल्या आमदारांना सांगितले आहे. भाजपाचे आमदार मायकल लोबो हे एकटेच सिक्वेरा यांचा पुतळा व्हायलाच हवा म्हणून आग्रही आहेत. भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायलाच हवा, अशी मागणी केलेली नाही पण सरकार पुतळा उभा करणार असेल तर आपला त्यास आक्षेप नसेल असे मंत्री डिसोझा यांनी सांगितले. तसेच सिक्वेरा यांनी जनमत कौल चळवळीत योगदान देऊन 50 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर आताच पुतळा उभारण्याची मागणी का पुढे आली असा प्रश्नही डिसोझा यांनी करून या सगळ्या विषयाला राजकीय वास येत असल्याचे नमूद केले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सध्या तरी पक्ष संघटनेची भूमिका ऐकलेली आहे. सिक्वेरा यांचा पुतळा उभा केला म्हणून भाजपाला कोणताच राजकीय लाभ होणार नाही, कारण भाजपाचे बहुतांश विधानसभा मतदारसंघ हे हिंदूबहुल मतदारांचे आहेत.

तिथे सिक्वेरा यांच्या पुतळ्याचा विषय चालतच नाही. सासष्टी तालुक्यापलिकडे सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाच्या विषयात कुणाला स्वारस्यही नाही. तथापि, भाजपाप्रणीत आघाडी सरकारमध्ये गोवा फॉरवर्ड हा घटक पक्ष असून या पक्षाने या विषयावरून दबाव वाढविण्याचे ठरवले आहे. भाजपाचे आमदार लोबो यांची साथ गोवा फॉरवर्डला मिळत आहे. भाजपामध्ये सात ख्रिस्ती आमदार आहेत. त्यापैकी दोघे मंत्री आहेत. त्यांनी सिक्वेरा यांचा पुतळा उभा करण्याची मागणी केलेली नसली तरी, वातावरण तापलेच तर ते लोबो यांना साथ देऊ शकतात. भाजपा पक्ष संघटनेला याची कल्पना आहे. मुख्यमंत्र्यांनी पुतळा उभा करणार नाही अशी भूमिका अजून घेतलेली नाही पण विधानसभा प्रकल्पाचे क्षेत्र हे सभापतींच्या अखत्यारित येते एवढेच विधान त्यांनी करून सभापतीच त्याविषयी काय तो निर्णय घेऊ शकतात असे सूचित केले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा देखील पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा घटक पक्ष आहे.

या पक्षाने स्व. सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेत नको अशी स्पष्ट भूमिका मांडून भाजप पक्ष संघटनेचे बळ वाढवले आहे. गोवा सुरक्षा मंचनेही पुतळा उभारण्याविरुद्ध कडक भूमिका घेण्याचे जाहीर केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 

Web Title: Dispute In Goa BJP Over Statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.