१० आमदारांविरुद्धचे अपात्रता प्रकरण २ रोजी सुप्रीम कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:13 AM2020-12-30T00:13:55+5:302020-12-30T06:59:57+5:30
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांच्या विरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी २ जून २०२० रोजी याचिका सादर केली होती.
पणजी : गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, जलस्रोतमंत्री फिलिप नेरी यांच्यासह काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांविरुद्धची अपात्रता याचिका २ जानेवारी २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला येत आहे. सुनावणीच्या यादीत ही याचिका लागण्याची ही १९ वी वेळ असून, यापूर्वी १८ वेळा ती बोर्डवर लागली होती; परंतु सुनावणीला आलीच नव्हती.
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांच्या विरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी २ जून २०२० रोजी याचिका सादर केली होती. सुनावणीसाठी तारीख दिल्यानंतरही प्रत्येकवेळी ती पुढे ढकलली गेली होती. त्यामुळे चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीविरुद्धच याचिका सादर केली होती. त्यानंतर ही याचिका सुनावणीला येण्याची ही पहिली वेळ आहे. २ जानेवारी रोजी या प्रकरणात सुनावणी होईल, अशी अपेक्षा चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. १० जुलै २०१९ रोजी काँग्रेसचे १० आमदार फुटून भाजपात दाखल झाले होते.
८ ऑगस्ट २०१९ रोजी चोडणकर यांनी गोवा विधानसभेच्या सभापतींकडे त्यांच्या विरुद्ध अपात्रता याचिका सादर केली होती; परंतु सभापतींनी या याचिकेवर निवाडा दिला नसल्यामुळे हे प्रकरण ठरावीक वेळेच्या मुदतीत निकालात काढण्याचा आदेश सभापतींना द्यावा, या मागणीसाठी चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या १० आमदारांच्या बाबतीत काय निवाडा लागतो, यावर त्या दहा जणांचेही भवितव्य अवलंबून आहे आणि राज्य सरकारचेही भवितव्य अवलंबून आहे.