नेतृत्वाला धक्का देण्याचा असंतुष्टांचा प्रयत्न फसला!; आम्ही सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2024 09:14 AM2024-09-24T09:14:29+5:302024-09-24T09:14:59+5:30

सर्व मंत्र्यांचा सावंत यांच्या नेतृत्वाला पाठिंबा असल्याचे काल स्पष्ट झाले.

dissidents attempt to shock the leadership failed we all ministers with the chief minister | नेतृत्वाला धक्का देण्याचा असंतुष्टांचा प्रयत्न फसला!; आम्ही सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत

नेतृत्वाला धक्का देण्याचा असंतुष्टांचा प्रयत्न फसला!; आम्ही सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: काही असंतुष्ट घटक व विरोधकांनी मिळून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाला धक्का देण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. सर्व मंत्र्यांचा सावंत यांच्या नेतृत्वाला पाठिंबा असल्याचे काल स्पष्ट झाले.

मुख्यमंत्र्यांविरुद्ध बदनामीचे व्हिडीओ व संदेश व्हायरल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर व पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. 'आम्ही अकराही मंत्री एकसंध आहोत आणि सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत, असे दोघांनीही सांगितले. या पत्रकार परिषदेला पक्षाचे सरचिटणीस तथा एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

शिरोडकर म्हणाले की, सावंत सरकारच्या काळात अनेक विकासकामे झालेली आहेत. सध्या जे काही सोशल मीडियावर चालले आहे ती मुख्यमंत्र्यांची निव्वळ बदनामी आहे. लोकांनी व्हायरल व्हिडीओ किंवा बदनामीकारक संदेशांना बळी पडू नये. माझ्या शिरोडा मतदारसंघात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम शंभर टक्के झाले आहे. मडकई मतदारसंघातही २०० कोटी रुपयांची भमिगत वीज वाहिन्यांची कामे चालू आहेत. सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा चौफेर विकास चालला आहे. त्यांना बदनाम करण्यासाठीच अपप्रचार केला जात आहे.

गलिच्छ राजकारण : सुभाष शिरोडकर

मुख्यमंत्र्यांविरुद्ध गलिच्छ राजकारण चालू आहे. काही असंतुष्ट लोकच त्यांच्या बदनामीचे व्हिडीओ व्हायरल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मंत्री शिरोडकर म्हणाले की, मी प्रतापसिंह राणे यांच्यापासून दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री म्हणून काम केले आहे. आता सावंत यांच्या मंत्रिमंडळात आहे. भू-बळकाव घोटाळा प्रकरणात एसआयटी तसेच आयोग नेमून चौकशी करून सावंत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सरकारचे प्रमुख म्हणून ते जनतेची योग्यप्रकारे सेवा बजावत आहेत.

कसलेही पुरावे नसलेले आरोप : रोहन खंवटे

रोहन खंवटे यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध दिशाभूल करणारे व्हिडीओ काही असंतुष्ट व्हायरल करत असल्याचा आरोप करून या प्रवृत्तींचा निषेध केला. ते म्हणाले, व्हिडीओमध्ये केलेल्या आरोपांना कोणतेही पुरावे नाहीत. मुख्यमंत्र्यांवर खोटेनाटे आरोप करून त्यांची बदनामी केली जात आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो.

सरकार पडणे अशक्य

दरम्यान, विरोधकांमधील आमदार सत्ताधाऱ्यांमधील काहीजणांना जवळ करून सरकार अस्थिर करू पाहतात, अशी चर्चा काल दक्षिण गोव्याच्या काही भागांत पसरली होती. पण सरकार अस्थिर होणे शक्य नाही. उत्तर व दक्षिणेतील काही आमदार आपल्याला मंत्रीपद न मिळाल्याने नाखूष आहेत. एक भाजप आमदार तर २०२७ पूर्वी स्वतःचा प्रादेशिक पक्षही स्थापन करू पाहतोय. सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विरोधकांमधील काहीजण सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. पण सरकार मजबूत आहे, याची कल्पना गेल्या दोन दिवसांत असंतुष्टांना आली. पूर्ण भाजप पक्ष मुख्यमंत्र्यांसोबत आहे.

ही तर कॉमेडी सर्कस : सुनील कवठणकर

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी जोरदार टीका करताना ही कॉमेडी सर्कस असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सर्व मंत्री सावंत यांच्या नेतृत्त्वासोबत ठामपणे आहेत हे सांगण्यासाठी दोन मंत्र्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागणे हे दुर्दैव आहे. सुभाष शिरोडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांकडून हे अपेक्षित नव्हते. जोपर्यंत भाजप हायकमांडचा सावंत यांना आशीर्वाद आहे, तोपर्यंत नेतृत्त्व त्यांच्याकडेच राहील व उर्वरित सर्व ३२ सत्ताधारी आमदारांना सावंत यांनाच पाठिंबा द्यावा लागेल, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे शिरोडकर व खंवटे कोणाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत? असा प्रश्न निर्माण होतो. मंत्रिमंडळात काही बदल करण्याच्या हालचाली असाव्यात म्हणून हे मंत्री पाठिंब्यार्थ आले नसावेत ना? असा संशयही कवठणकर यांनी व्यक्त केला आहे.
 

 

Web Title: dissidents attempt to shock the leadership failed we all ministers with the chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.