गोव्यात उपसभापतीच्या पुत्राची बीए पदवी प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 03:54 PM2020-02-26T15:54:49+5:302020-02-26T15:55:11+5:30
अव्वल कारकुनपदासाठी सादर केलेली लखनौची पदवी वादाच्या भोवऱ्यात
पणजी : उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा पुत्र रमंड याने अव्वल कारकुनपदासाठी सादर केलेली बीए पदवी प्रमाणपत्राची वैधता व सत्यासत्यता पडताळण्याचे निर्देश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी गोवा विद्यापीठाला दिले आहेत.
उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयात वरील पदासाठी अर्ज करताना रेमंड याने लखनऊ येथील भारतीय शिक्षा परिषदेची कला शाखेचे २00७ चे पदवी प्रमाणपत्र सादर केले होते. सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्यस यांचा या प्रमाणपत्राला आक्षेप असून ही पदवी बोगस असल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणात त्यांनी मुख्य सचिव परिमल राय यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे.
रेमंड हा मिरामार येथील रेड रोझरी स्कूलचा विद्यार्थी होता व तेथे २00१ साली इयत्ता दहवीत तो नापास झाला होता, असा आयरिश यांचा दावा आहे. ही पदवी बोगस असल्याचा त्यांचा दावा आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार भारतीय शिक्षा परिषद अनधिकृत आहे आणि १९५६ च्या विद्यापीठ अनुदान आयोग कायद्याच्या कलम २ (फ) आणि कलम ३ चा भंग करुन कार्यरत आहे.
१८ जानेवारी रोजी अव्वल कारकूनपदासाठी लेखी परीक्षा झाली. तेथे महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या वशिलेबाजीने रेमंड याला आधीच प्रश्नपत्रिका दिली गेल्याचे पुरावेही उपलब्ध झाल्याचा दावा आयरिश यांनी केला आहे. रेमंड यांनी सादर केलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची सत्यासत्यता पडताळून पाहिली जावी तसेच सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जावी. गोवा लोकसेवा आयोगाने रेमंड याच्या इंटेलिजंट क्वोशंटबाबत मूल्यांकन करावे आणि या प्रकरणात काही काळेबेरे असल्यास ते उघड करावे, अशीही आयरिश यांची मागणी आहे.
उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे असे म्हणणे आहे की त्यांचा पुत्र रेमंड याच्याबाबतीत आयरिश यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तोच सरकारच्या योग्य त्या अधिकारीणीकडे उत्तर देईल, त्यात आपण हस्तक्षेप करू इच्छित नाही. मात्र पोर्तुगीज नागरिकत्त्व प्रकरणात एक ना एक दिवस योग्य ते उत्तर मी आयरिश यांना देईन.’ आयरिश यांनी याआधी इजिदोर यांच्याविरुध्द पोर्तुगीज नागरिकत्त्व प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती.