जि. पं. निवडणुकीबाबत न्यायालयात दाद मागणार
By admin | Published: February 25, 2015 03:00 AM2015-02-25T03:00:00+5:302015-02-25T03:00:14+5:30
मडगाव : आतापर्यंत विरोध झाल्याने स्थानिक पातळीवर गाजलेला जिल्हा पंचायत निवडणुकीचा वाद यापुढे न्यायालयात गाजणार आहे.
मडगाव : आतापर्यंत विरोध झाल्याने स्थानिक पातळीवर गाजलेला जिल्हा पंचायत निवडणुकीचा वाद यापुढे न्यायालयात गाजणार आहे. या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेलाच आव्हान देणारी याचिका ‘गोवाज मुव्हमेंट अगेन्स्ट पंचायत आॅर्डिनन्स’ (जीएमपीओ) या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेण्याचे ठरविले आहे. येत्या सोमवारी ही याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. या संघटनेबरोबरच पेडणेतील एक गटही न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून या गटाकडून मतदारसंघ फेररचनेला आव्हान देण्यात येणार आहे.
जीएमपीओचे निमंत्रक कॅनेडी आफोन्सो यांनी ही माहिती दिली. गोवा सरकारने या निवडणुकीची जी प्रक्रिया सुरू केली आहे ती पूर्णत: बेकायदेशीर आहे. निवडणुकीच्या नियमावलीवर हरकती सुचविण्यासाठी ३ फेब्रुवारीला गोवा सरकारतर्फे जाहिरात देण्यात आली होती. यासंबंधी नंतर कुठलीही सुनावणी न घेता ५ फेब्रुवारीला या निवडणुकीच्या वटहुकूमावर राज्यपालांची सही झाली. याचाच अर्थ ज्या दिवशी जाहिरात प्रसिध्द झाली होती त्या पूर्वीच या जिल्हा पंचायत निवडणुकीचा वटहुकूम काढला गेला होता. हाच मुद्दा या याचिकेत मांडल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय या संघटनेने मतदारसंघ फेररचनेलाही हरकत घेतली आहे.
यासंदर्भात गावपातळीवर जागृती करण्यासाठी लवकरच आपल्या संघटनेच्या बैठका सुरू होतील, असे आफोन्सो यांनी सांगितले. ज्या मतदारसंघात पक्षाच्या चिन्हावर कुठलाही उमेदवार निवडणूक लढवत असेल तर त्या उमेदवाराच्या विरोधात ही संघटना प्रचार करेल, असे आफोन्सो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)