जि. पं. निवडणुकीवर काँग्रेसचा बहिष्कार?
By admin | Published: February 21, 2015 02:16 AM2015-02-21T02:16:10+5:302015-02-21T02:19:49+5:30
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेऊ नका, अशी मागणी करूनदेखील सरकारने पक्षीय पातळीची पद्धत लादल्यामुळे काँग्रेसने
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेऊ नका, अशी मागणी करूनदेखील सरकारने पक्षीय पातळीची पद्धत लादल्यामुळे काँग्रेसने या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार चालवला आहे. ‘हात’ या निशाणीवर उमेदवार रिंगणात न उतरविता अप्रत्यक्षरीत्या काही उमेदवारांना पक्षाने पाठिंबा द्यावा का, याबाबत सोमवारी अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने बैठक बोलावली आहे.
पक्षीय पातळीवर जिल्हा पंचायत निवडणुका नको, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसने राज्यपालांना यापूर्वी दिलेले आहे. तत्पूर्वीच सरकारने वटहुकूम जारी करून कायद्यात दुरुस्तीही केली. सरकारने भाजपला सोयीचे होईल, अशा पद्धतीने जिल्हा पंचायत मतदारसंघांची फेररचना व आरक्षण केल्यानेही काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेस पक्ष स्वत:च्या निशाणीवर उमेदवारांना रिंगणात न उतरविता अप्रत्यक्षरीत्या काही उमेदवार पुरस्कृत करू पाहत आहे. सरकारने पक्षांतर बंदी कायदाही जिल्हा पंचायतींसाठी लागू केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणाऱ्या उमेदवारांनाही भाजप नंतर फोडू शकतो. याचा विचार करून काँग्रेस पक्ष निवडणुकीवर बहिष्कार टाकू पाहत आहे. मात्र, याबाबत अजून निर्णय झालेला नाही.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता काँग्रेसची राज्य कार्यकारिणी व काँग्रेस विधिमंडळ पक्ष यांची संयुक्त बैठक होणार आहे. काँग्रेसच्या माजी आमदारांनाही या बैठकीस बोलविण्यात आले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका त्या बैठकीत ठरणार आहे. काँग्रेसचे काही आमदार पक्षीय पातळीवर निवडणुका व्हाव्यात, या मताचे आहेत. (खास प्रतिनिधी)