जि. पं. निवडणुकीवर राष्ट्रवादीचा बहिष्कार
By admin | Published: February 22, 2015 01:23 AM2015-02-22T01:23:08+5:302015-02-22T01:28:05+5:30
पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी १८ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा,
पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी १८ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत शनिवारी बांबोळी येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.
प्रथमच जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय स्तरावर घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षस्तरावर या निवडणुकीत भाग घेऊ नये. भाजपने स्वत:च्या सोयीप्रमाणे मतदारसंघांची फेररचना व आरक्षण करून घेतले आहे, असा सूर बहुतेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत लावला. राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरीत्या काही मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यावा; पण पक्षाच्या निशाणीवर या निवडणुका लढवू नयेत, असा सल्ला पटेल यांनी दिला. सर्वांनी तो सल्ला मान्य केला. तथापि, राष्ट्रवादीने जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हा पक्षाच्या हिताचा नाही, असे काही पदाधिकाऱ्यांना वाटते. लोकसभा निवडणूकही राष्ट्रवादीने गोव्यात लढवली नव्हती व त्यामुळे पक्षाकडे कार्यकर्तेच शिल्लक राहिलेले नाहीत.
डॉ. प्रफुल्ल हेदे, देवानंद नाईक, ट्रोजन डिमेलो, जुझे फिलिप डिसोझा, सुरेंद्र सिरसाट, अविनाश भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत भाग घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर हे गोव्याबाहेर असल्याने बैठकीस आले नाहीत. राष्ट्रवादीला गोव्यात बळकट करायला हवे. त्यासाठी काम करा, असा सल्ला पटेल यांनी सर्वांना दिला. काँग्रेस पक्षात तुम्ही जाऊ नका, असा सल्ला पटेल यांनी डिमेलो यांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारून पक्षबांधणी करण्यास आपण तयार आहोत, असे देवानंद नाईक यांनी बैठकीत पटेल यांना सांगितले. भास्कर जाधव यांची गोवा राष्ट्रवादीसाठी निरीक्षक म्हणून पटेल यांनी नियुक्ती जाहीर केली.
दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणुका पार पडल्यानंतर गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट केला जाईल व त्यासाठी चाळीसही मतदारसंघांत पक्षातर्फे जनजागृती अभियान राबविले जाईल, असे पटेल यांनी सांगितले. गोव्यातील प्रादेशिक आराखडा, मायनिंग, माध्यम प्रश्न, कॅसिनो अशा विषयांवरून भाजप सरकारबाबत असंतोष असून जनजागृती अभियानातून लोकांचे लक्ष
नव्याने या विषयांकडे वळविले जाईल, असे पटेल म्हणाले. (खास प्रतिनिधी)