उजळले लक्ष दीप; नरकासुर प्रतिमा दहनाने गोमंतकीयांनी केले दिवाळीचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 09:22 AM2023-11-12T09:22:52+5:302023-11-12T09:23:13+5:30
राज्यभरात रविवारी पहाटे मध्यरात्री नरकासूराच्या प्रतिमेचे दहन करून गोमंतकीयांनी प्रकाशपर्वाचे स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दिवाळी हा रोषणाईचा, लखलखत्या दिव्यांनी वातावरणातल्या अंधःकाराचं साम्राज्य दूर सारण्याचा, आयुष्य तेजोमय, प्रकाशमय करण्याचा सण. राज्यभरात रविवारी पहाटे मध्यरात्री नरकासूराच्या प्रतिमेचे दहन करून गोमंतकीयांनी प्रकाशपर्वाचे स्वागत केले.
अभ्यंग स्नान, दारात घातलेल्या रंगबिरंगी रांगोळ्या, दरावर झेंडूच्या फुलांच्या, माळांचे तोरण लावून दिव्यांच्या या उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज, लक्ष्मीपूजन, मंगळवारी दिवाळी पाडवा तर बुधवारी भाऊबीज साजरी होणार असून त्यासाठी गोमंतकीय सज्ज झाले आहेत.
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काल शनिवारी पणजीत राजधानीत मुख्य बाजारामध्ये ग्राहकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. मिठाई, दिवे, आकाशकंदील तसेच अन्य विविध साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. शहरातील मुख्य मार्केटसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी होती. शहरात पणत्या, आकाशकंदील, फटाके यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे मार्केटमध्ये वाहतूककोंडी झाली.
दिवसभर लोकांची खरेदीसाठी गर्दी होती. अक्षरश: वाहने पार्क करण्यासाठी जागाही उपलब्ध नव्हती. मार्केटमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. वाढत्या गर्दीमुळे लोकांना लांब अंतरावर चारचाकी गाड्या पार्क करून बाजारात यावे लागले.
नरकासुर पाहण्यासाठीही गर्दी
दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी मोठमोठे नरकासुर करण्यात आले आहेत. ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. राज्यभरातील लोकांना नरकासुराच्या अकराळविकराळ प्रतिमा आकर्षण ठरल्या. त्यामुळे शहरात बहुतांश ठिकाणी गर्दीवर नियंत्रण
ठेवण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते. शहरातील पाटो, मळा या भागात मोठमोठे नरकासुर केले जातात. मळा परिसरात नरकासुर पाहण्यास मोठी गर्दी झाली. रात्रभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दिवाळी हा सण आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, जो जात, पात, धर्म यांचा विचार न करता मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा केला जातो. या सुंदर सणानिमित्त मी सर्व लोकांना विनंती करतो की, समाजातून वाईट गोष्टींचे उच्चाटन करा आणि देशात सामाजिक सलोखा, सद्भावना वृद्धिगत करा. -पी. एस. श्रीधनर पिल्लई, राज्यपाल
दिवाळीचा प्रकाश एकात्मतेच्या भावनेने लोकांचे मन आणि हृदय उजळून टाकू शकेल. हा सण लोकांना वाईटावर विजय मिळवून शांतता आणि जातीय सलोखा नांदेल, असा समाज निर्माण करण्याची प्रेरणा देतो. त्या दिवशीची रोषणाई आपल्याला भगवान रामाच्या उच्च आदर्शाची आठवण करून देते, जे या दिवशी अयोध्येला परतले. राज्यात 'वोकल फॉर लोकल'ला महत्त्व देऊया. -मुख्यमंत्री प्रमोद सावंत
ही दिवाळी सर्वांना सुख, समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो . आपल्या सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आनंदासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो . दिवाळीतील प्रत्येक सण आपल्या जीवनात आनंद घेऊन येवो. - श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री