'चुका करायला घाबरु नका, त्या चुकीत उद्याचा आविष्कार दडलेला असेल', नोबेल पुरस्कार विजेत्यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 04:56 PM2018-02-03T16:56:22+5:302018-02-03T16:57:41+5:30
इंग्लंडचे नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड रॉबर्डस् व थॉमस लिंडहाल यांनी हा मंत्र मडगावातील विद्यार्थ्यांना दिला.
मडगाव : चुका होतील या भीतीने प्रयत्न करणे सोडून देऊ नका, मुख्य म्हणजे चुका करण्यासच घाबरु नका, तुमच्या या आजच्या चुकीत कदाचित उद्याचा महान आविष्कार दडलेला असू शकत. इंग्लंडचे नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड रॉबर्डस् व थॉमस लिंडहाल यांनी शनिवारी हा मंत्र मडगावातील विद्यार्थ्यांना दिला.
नोबेल प्राईज सिरिजमध्ये शनिवारी या दोन्ही नोबेल पुरस्कार विजेत्यांशी सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी मडगावच्या रवींद्र भवनात संवाद साधला. यावेळी दोन्ही विजेत्यांनी विद्यार्थ्यांशी समरस होऊन गप्पा मारल्या. त्यांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. आणि आपल्या शोधाबद्दलही माहिती दिली.
डीएनएमधील इंन्ट्रोन्सचा शोध लावणा-या रिचर्ड रॉबर्डस् या ब्रिटीश बायोकेमिस्टला 1993 सालचा वैद्यक विभागातील तर कॅन्सरवर संशोधन करुन डीएनएची दुरुस्ती यंत्रणा शोधून काढणारे थॉमस लिंडहाल यांना 2015 सालचा रसायन शास्त्रचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. या दोन्ही शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
संशोधन करताना कित्येकवेळा अपयश येते, कित्येकवेळा चुकाही घडतात. वास्तविक या चुकांच्या मालिकांतूनच नवीन आविष्काराची जडणघडण ठरते. त्यामुळे अपशयाला घाबरुन चालणार नाही असे रॉबर्ड रिचर्डस् म्हणाले. ते म्हणाले, कित्येकवेळा यश मिळण्यासाठी तुमच्या प्रयत्नांबरोबरच नशिबाचीही गरज असते. मी स्वत: कित्येकवेळा असा नशिबवान ठरलो आहे. मात्र नशिबाने दिलेली संधी वाया घालविता कामा नये.
थॉमस लिंडहाल म्हणाले, नशिबाबरोबरच खडतर प्रयत्नांच्या अभावी यश तुमच्यापासून दूर जाऊ शकते. जर तुम्हाला कुठलाही छंद असेल तर तो जोपासून त्यातच आपले करियर शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर कुठलीही गोष्ट आवडत असेल तर ती जरुर करा असे त्यांनी सांगितले.
भारत एवढा मोठा देश असून आतार्पयत या देशात केवळ दोनच नोबेल पुरस्कार विजेते का ठरु शकले या प्रश्र्नाला उत्तर देताना रॉबर्डस् म्हणाले, भारताने आता शिक्षण, विज्ञान व संशोधन या तीन क्षेत्रत जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज आहे. भारतात संशोधन वाढल्यास वैज्ञानिकही वाढतील.
आल्फ्रेड नोबेलसारख्या शास्त्रज्ञाने डायनामाईटचा शोध लावला. मात्र त्यानंतर या शोधाचा विध्वंसासाठी वापर केला गेला, याबद्दल या दोन्ही शास्त्रज्ञांना विचारले असता, कुठलाही शास्त्रज्ञ चांगल्यासाठीच संशोधन करतो. पण हा शोध जेव्हा इतरांकडे पोचतो तेव्हा मात्र त्या शास्त्रज्ञाचा आपल्या संशोधनावर कुठलेही नियंत्रण राहू शकत नाही. कुठल्याही संशोधनाचा चांगला वापर करावा की वाईट हे समाजाने ठरवायचे असते असे लिंडहाल म्हणाले.