वीज दरवाढ करुन सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका; जेईआरसीने घेतली सुनावणी
By पूजा प्रभूगावकर | Published: January 8, 2024 04:49 PM2024-01-08T16:49:09+5:302024-01-08T16:50:03+5:30
१५० कोटींहून अधिकची थकीत बिले वसूल करा: वीज दरवाढीला जनसुनावणीत लोकांकडून विरोध.
पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी: वीज दरवाढ करुन सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका, त्यापेक्षा वीज खात्याने अगोदर १५० ते १६० कोटींची थकीत वीज बिले वसूल करावी म्हणजे वीज दरवाढ करावी लागणार नाही असा सल्ला देत राज्यातील प्रस्तावित ३.४८ टक्के वीज दरवाढीला संयुक्त वीज नियमन आयोगाने (जेईआरसी) पणजी घेतलेल्या जनसुनावणीत लोकांनी तीव्र विरोध केला.
प्रस्तावित वीज दरवाढीवर उत्तर गोव्यासाठी जेईआरसी ने पणजीतील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात जनसुनावणी घेतली. यावेळी वीज खात्याचे प्रधान मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी ० ते २०० युनिट पर्यंतच्या वीज ग्राहकांना ६ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा तर एकूण ३.४८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव मांडला. मात्र यावेळी या प्रस्तावाला अनेकांनी तीव्र विरोध केला.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, की महागाईचा स्तर पाहता वीज खात्याची प्रस्तावित वीज दरवाढ ही जास्त आहे. यामुळे सामान्यांना मोठा फटका बसणार आहे. एका बाजूने सरकारन वीज दरवाढ करु पहात आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर पथदीप पेटत नाही. यामुळे वाहन चालकांचे रात्रीच्यावेळी अपघात होत आहेत. पणजीत पथदीप बंद असल्याने अंदाज न आल्याने मळा भागात एक युवक अपघातात ठार झाला. यामुळे वीज खाते काय करते ? असा संतप्त सवाल त्यांनी केला.