देवेगौडांचाही कळसा हट्ट
By admin | Published: September 19, 2015 02:01 AM2015-09-19T02:01:59+5:302015-09-19T02:02:10+5:30
डिचोली : माजी पंतप्रधान तथा निधर्मी जनता दलाचे संस्थापक एच. डी. देवेगौडा यांनी शुक्रवारी कणकुंबी येथे कळसा प्रकल्पाला भेट दिली
डिचोली : माजी पंतप्रधान तथा निधर्मी जनता दलाचे संस्थापक एच. डी. देवेगौडा यांनी शुक्रवारी कणकुंबी येथे कळसा प्रकल्पाला भेट दिली. केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून कर्नाटकला प्रलंबित असलेले काम पूर्ण करण्यास परवानगी द्यावी, यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कणकुंबी येथे काही दिवसांपूर्वी कुदगोळचे काँग्रेस आमदार सी. एस. शिवेळ्ळी यांनी आपल्या समर्थकांसह दोन दिवस शक्तिप्रदर्शन घडवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता शुक्रवारी निधर्मी जनता दलाने याप्रश्नी आपणही मागे नाही, हे दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी कणकुंबी येथे देवेगौडा पोहचले. त्यांनी कळसा प्रकल्पाची जागा त्याचप्रमाणे सुर्ल आणि कळसा नाल्याचा उगम होतो, त्या जागेची पाहणी केली. देवेगौडा म्हणाले की, मी या प्रकरणात लक्ष घातले आहे. केंद्र सरकारने उत्तर कर्नाटकातील लोकांची गंभीर स्थिती बघून न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. या वेळी त्यांच्यासोबत कर्नाटक निजद पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. ही सर्व मंडळी कळसा कालव्याचे काम पूर्ण व्हावे याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होती.
दरम्यान, देवेगौडा हे कणकुंबीतील मंदिराला भेट देणार असल्याचे समजताच उपसरपंच नंदकुमार गावडे गावकऱ्यांसह उपस्थित होते. माउली देवस्थानचे अध्यक्ष प्रा. बबन दळवी यांनी या प्रकल्पामुळे माउली मंदिराच्या सभागृहाला धोका निर्माण झाला असून ही समस्या मांडण्याचे ठरवले होते. मात्र, इतक्या महत्त्वाच्या प्रश्नी लक्ष देण्यास वेळ काढला नसल्याबद्दल ग्रामस्थांनी माजी पंतप्रधानांच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली.
(प्रतिनिधी)