पराभवाने खचू नका, मतदारांचे घरी जाऊन भार माना; मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेतील कार्यकर्त्यांना सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 09:22 AM2024-07-10T09:22:48+5:302024-07-10T09:30:29+5:30

मडगाव येथे सभा

do not get tired of defeat in south goa lok sabha election cm pramod sawant advice to bjp workers  | पराभवाने खचू नका, मतदारांचे घरी जाऊन भार माना; मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेतील कार्यकर्त्यांना सल्ला 

पराभवाने खचू नका, मतदारांचे घरी जाऊन भार माना; मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेतील कार्यकर्त्यांना सल्ला 

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावे. ज्या मतदारांनी भाजपला मतदान केले त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या घरी जाऊन आभार माना, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांना केले.

येथील दक्षिण गोवा भाजप कार्यालयात आयोजित 'धन्यवाद मतदार, अभिनंदन मतदार' या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, नावेली आमदार उल्हास तुयेकर, आमदार संकल्प आमोणकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकरस, माजी आमदार दामू नाईक, भाजपचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सर्वानंद भगत माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर उपस्थित होते. त्यांनी दक्षिण गोव्यात भाजप उमेदवाराचा का पराभव झाला, याचा आढावा घेतला. 

उत्तर गोव्यात १६ मतदारसंघात जिंकलो तर दक्षिण गोव्यात ११ मतदारसंघात जिंकलो. सांतआंद्रे मतदारसंघात केवळ ७६ मतांनी, तर हळदोणा मतदारसंघात केवळ ८० मतांनी आम्ही मागे राहिलो त्यामुळे तसे आम्ही २९ मतदारसंघात जिंकल्या सारखेच आहे. आपण २०२२ मध्ये २२ जागा जिंकल्या. आता २०२७ मध्ये २७ हून अधिक जागा जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. २०२७ मध्ये भाजपला बहुमत मिळेल, यावर आपल्याला १०० टक्के विश्वास आहे, असे ते म्हणाले.

दक्षिण गोव्यातील वेळ्ळी, नुवे, कुडतरी, कुंकळ्ळी व नावेली मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकणे आव्हानात्मक असते. परंतु आज जरी विधानसभा निवडणूक झाली तरीही आम्ही या जागा जिंकणार, याचा आपल्याला विश्वास आहे.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले, की २०२७ मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता येणार आहे. पुन्हा एकदा डॉ. सावंत हे मुख्यमंत्री बनतील. केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळे गोव्यातही भाजपचेच सरकार सत्तेवर येणे अपेक्षित आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असल्याने राज्यात विकासाला गती मिळाल्याचे कामत यांनी सांगितले.

मतदारांमधील 'तो' संभ्रम दूर करा

दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार केवळ १३ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान केल्यास संविधानात बदल केला जाईल, अशी भीती मतदारांच्या मनात निर्माण केल्याने काही मतदारांनी मतदानच केले नाही, अशी माहिती आपल्याला काही लोकांनी दिली. मतदारांच्या मनातील भ्रम दूर करण्याची हीच खरी वेळ आहे त्यासाठी कामाला लागा, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.
 

Web Title: do not get tired of defeat in south goa lok sabha election cm pramod sawant advice to bjp workers 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.