विरोधात बसून विकास होत नाही - नेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 10:43 PM2019-07-13T22:43:23+5:302019-07-13T22:43:40+5:30
विरोधी बाकांवर बसून सर्व मतदारसंघांमध्ये विकास करता येत नाही. सरकारच्या विकासाच्या योजना विरोधकांच्या मतदारसंघात पोहचायला हव्यात.
पणजी - विरोधी बाकांवर बसून सर्व मतदारसंघांमध्ये विकास करता येत नाही. सरकारच्या विकासाच्या योजना विरोधकांच्या मतदारसंघात पोहचायला हव्यात. आम्ही सरकारमध्ये गेल्याने आता आमचे मतदारसंघ विकसित होतील, असे भाजपचे नवे मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांनी शनिवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.
नेरी हे वेळ्ळी मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात ख्रिस्ती मतदारांची संख्या जास्त आहे. नेरी यांनी यापूर्वी स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात काम केले होते. नेरी म्हणाले, की विरोधी बाकांवर गप्प बसून राहण्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलेले नाही. सरकारकडून कामे करून घेण्यासाठी आम्हाला निवडले गेले. आमच्या मतदारसंघात जर विकास कामे व्हायची असतील तर आम्हाला सत्तेमध्ये जावेच लागेल. त्यामुळेच आम्ही सत्तेमध्ये सामिल झालो. आम्ही भाजपमध्ये गेलो व मंत्री झाल्याने आता सरकारचा विकास कार्यक्रम आम्हाला आमच्या मतदारसंघातही राबविता येईल. रोजगार संधीही निर्माण करता येईल.
फिलिप नेरी म्हणाले, की लोकसभा निवडणुकीवेळी देशभर लोकांनी भारतीय जनता पक्षाला कौल दिला. गोव्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकांवेळीही लोकांनी भाजपला कौल दिला. आम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटलो तेव्हा त्यांनी आमचे मोठय़ा उत्साहाने स्वागत केले. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही आम्ही भेटलो तेव्हाही आमचे मोठय़ा सन्मानाने स्वागत केले गेले. भाजपमध्ये आमच्याविषयी कोणताच पक्षपात होणार नाही. आम्ही चांगले काम करून दाखवू. प्रशासन लोकांच्या दारात पोहचवू. शेवटी आम्ही राजकारणात लोकसेवा करण्यासाठीच आलो आहोत. मंत्री म्हणून काम करण्याचा मला अनुभव आहे. आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भाजपचेही काम वाढवू.