सोशल मीडियाद्वारे धार्मिक भावना दुखावू नका: आमदार मायकल लोबो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2024 07:32 AM2024-05-28T07:32:39+5:302024-05-28T07:34:59+5:30
नव्या कायद्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : सध्या सोशल मीडियावरून धर्माबद्दल पोस्ट करून लोकांच्या धार्मिक भावना दुखवण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. चुकीचा संदेश समाजात जाऊ लागला आहे. लोकांनी अशा प्रकारांना बळी न पडता राज्यातील धार्मिक सलोखा जपावा, असे आवाहन कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केले आहे.
धार्मिक भावना दुखवण्यासंबंधी राज्यात हल्ली घडलेल्या घटनांवर बोलताना आमदार लोबो म्हणाले, स्वघोषित नेते, काही एनजीओंकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होऊ लागला आहे. या मीडियाचा वापर करून आपण प्रसिद्ध व्हावे असे वाटणारे लोक याचा गैरवापर करू लागले आहेत. त्यातून लोकांच्या भावना दुखवू लागल्या आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करून नये. खास करून लोकांच्या धार्मिक भावना दुखवू नये. चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घेत सोशल मीडिया वापरावर लोकांनी नियंत्रण ठेवावे, असे लोबो यांनी म्हटले आहे.
गोव्यातील लोक धार्मिक सलोखा राखून शांततेने राहतात. मात्र, बाहेरील काही विघ्नसंतोषी लोक येथे येऊन स्वतःला गोमंतकीय समजून धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी सर्वांनी एकमताने एकत्रित राहणे गरजेचे आहे.
लोकांना सोशल मीडियाद्वारे चुकीच्या गोष्टींचा प्रचार करणाऱ्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई करायला हवी. त्याकरिता नवा कायदा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. विधानसभेतही आपण हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असेही आमदार लोबो यांनी शेवटी सांगितले.
समाजात चांगला संदेश जाईल, सलोखा टिकून राहील अशा पोस्टसाठी सोशल मीडियाचा वापर करावा. चुकीची माहिती देण्याबरोबरच, गैरवापर करण्यापेक्षा चांगल्या समाज हिताच्या गोष्टी प्रशासनाच्या नजरेला आणून देण्याच्या प्रयत्न करावा. यात खराब झालेले रस्ते, खंडित होणारा पुरवठासारख्या समाज हिताच्या गोष्टींवर भर द्यावा. स्वतःला चुकीच्या बाबींपासून दूर ठेवत चुकीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्याचे टाळण्याची गरज आहे.