पुलांना आत्महत्येचे केंद्र बनवू नका : कामत
By admin | Published: May 20, 2017 02:31 AM2017-05-20T02:31:54+5:302017-05-20T02:32:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : गोव्यातील पूल म्हणजे आत्महत्येचे केंद्र बनू नये. आत्महत्यांबाबत गोव्याचा क्रमांक देशात दहावा लागतो. मुख्यमंत्री मनोहर
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : गोव्यातील पूल म्हणजे आत्महत्येचे केंद्र बनू नये. आत्महत्यांबाबत गोव्याचा क्रमांक देशात दहावा लागतो. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या गंभीर विषयात लक्ष घालावे व राज्यातील सर्व पुलांच्या कडेला आत्महत्या प्रतिबंधक बॅरिकेड्स लावले जावेत, अशी मागणी गोवा विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
कामत यांनी म्हटले आहे, की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगभर पुलांच्या ठिकाणी आत्महत्या प्रतिबंधक उपाययोजना केली जाते. गोव्यासारख्या राज्यानेही अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलावे. पुलांच्या बाजूने जाळे लावणे तसेच बॅरिकेड्स उभारणे तसेच ‘नो सुसाईड्स’ अशा प्रकारचे फलक लावणे असे उपाय योजले जावेत.
कामत यांनी निवेदनात म्हटले आहे, की गोव्यातील पूल म्हणजे आत्महत्या करण्याच्या जागा नव्हे, असा संदेश लोकांमध्ये सरकारकडून जाऊ द्या. तसेच आत्महत्या करण्याचा विचार लोकांच्या व किशोरवयीन मुलांच्या मनात येऊ नये किंवा असा विचार आल्यास त्यांना त्या विचारापासून परावृत्त करता यावे म्हणून सरकारकडून मदतवाहिनी सुरू केली जावी, तसेच विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जावे, त्यांना मानसिक स्थितीबाबतची कार्डे दिली जावीत. मानसोपचारविषयक सामाजिक कार्यक्रम सरकारने हाती घ्यावा.
एक व्यक्ती आत्महत्या करायला पुलावर गेली म्हणून सावर्डे येथील एवढी मोठी दुर्घटना घडली. सरकारने सर्व पुलांचे सर्वेक्षण करावे, किती आत्महत्या कोणत्या पुलावरून झाल्या व आत्महत्या करण्याचा वेळ कोणता होता, या दृष्टीकोनातून माहिती गोळा करावी आणि त्यानुसार सर्वच पुलांवर उपाययोजना करावी, असे कामत यांनी सुचविले आहे.